जाने, २०१३

बृहन्महाराष्ट्र मंडळ - अध्यक्षीय: जाने., २०१३

मंडळी, नमस्कार!

लहानपणी मी वासुदेवशास्त्री यांची एक कविता वाचली होती. अमेरिकेत येऊन मला जरी २१ वर्षे झाली तरी ती कविता मनात कायम घर करून आहे.
पोटासाठी भटकत जरी दूरदेशी फिरेन
मी राजाच्या सदनी अथवा घोर रानी फिरेन
नेवो नेते जड तनूस ह्या दूरदेशी दैव
राहे चित्ती प्रिय मम तरी जन्मभूमी सदैव!!!

आता या कवितेतला दैव हा शब्द बदलून प्रारब्ध, आकांक्षा असा जरी केला तरी मला वाटतं की थोड्याफार फरकाने जगभर विखुरलेल्या प्रत्येक माणसाच्या याच भावना असतात. त्याच भावनेला साद घालून १ ते २१ जानेवारी या दरम्यान मी भारत भेटीला जात आहे. आईवडील, आप्तस्वकीय यांना भेटण्याचा स्वार्थ तर यात आहेच पण त्याचबरोबर परमार्थाच्या अनेक गोष्टींना या तीन आठवड्यात पूर्णत्व येईल. कनेटिकट मधली प्राथमिक शाळेतली दु:खद घटना, आयर्लंड मधली गर्भपाताची केस, दिल्लीच्या बसमधला हादसा, मुंबई-पुणे रस्त्यावरचा आनंद अभ्यंकरांचा अपघात अशा आणि अनेक घडलेल्या घटना पाहिल्या की वाटतं, की खरोखरच या जगाला परमार्थाची खूप गरज आहे. मायन लोकांनी वर्तवलेला जगाचा शेवट हा कदाचित मानवाच्या नीतीमूल्यांचा शेवट असेच असण्याची दाट शक्यता आहे. या सर्व गोष्टीतून बाहेर येऊन एका नव्या जोमाने, उत्साहाने, उमेदीने आपण सर्व २०१३चे स्वागत करूया.

बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या (बृ.म.मं./ BMM) आघाडीवर २०१२चे वर्ष अत्यंत साफल्यपूर्ण गेले. आमच्या कामांबद्दल आणि त्यातून काय साध्य केले यांचा आढावा मी डिसेंबर २०१२च्या अध्यक्षीय लेखामधे घेतला होताच, त्याचनुसार डिसेंबरच्या ९ तारखेला बृहन्महाराष्ट्र मंडळाची पहिलीवहिली टाउन हॉल मीटिंग घेतली. बृ. म. मंडळाच्या प्रत्येक उपक्रमासाठी सादरीकरण आणि प्रश्नोत्तरे असे स्वरूप वापरले. बॉस्टन अधिवेशनाच्या पूर्ण टीमने अधिवेशनाच्या तयारीबद्दल उपस्थितांना माहिती दिली. Web based virtual meeting असल्यामुळे त्यात उत्तर अमेरिकेतल्या ५०% पेक्षा जास्त मंडळांचा सहभाग होता. ह्या मीटिंगचा प्रतिसाद बघून आणि मंडळांच्या विनंतीला मान देऊन पुढची टाउन हॉल मीटिंग मार्चमधे होईल.

या महिन्यापासून BMM Directory प्रकल्पाचा पुढचा टप्पा सुरू होईल. श्री मोहन रानडे या उपक्रमावर काम करत आहेत. उत्तर अमेरिकेतल्या ५५+community साठी यात त्यांची नावे, पत्ते, ई-मेल वगैरे असतीलच पण त्याच प्रमाणे सोशल सिक्युरिटी, मेडिकेअर, असिस्टेड लिव्हिंग, टॅक्सेस, विधी/संस्कार, अशा विषयांवर तज्ञांचे लेखही असतील. गेल्या १२ वर्षांपासूनच्या तुम्हा सर्वांच्या मागणीला मूर्त स्वरूप देण्यास मला अभिमान वाटतो. या प्रकल्पासाठी तुम्हा सर्वांचे सहकार्य मिळेल अशी अपेक्षा करतो.

कट्रिना, सँडी सारख्या नैसर्गिक आपत्तींनंतर आपल्या उत्तर अमेरिकेतल्या मराठीजनांच्या संघटीतपणाची, सुरक्षिततेची, चौकशी करण्याची क्षमता BMM Directory नक्कीच पूर्ण करेल.

सँडीचे परिणाम अमेरिकेच्या ईस्ट कोस्टवर दीर्घकाळ राहिले. परिणामी इकडच्या मंडळांनी त्यांचे दिवाळीचे कार्यक्रम डिसेंबरमधे केले. ८ डिसेंबरला फिलाडेल्फिया मंडळाच्या दिवाळीच्या कार्यक्रमात सहभागी झालो. डेलावेअर-फिलाडेल्फिया हे फारफार तर तासाचे अंतर असल्यामुळे बहुतांशी सभासद माझ्या ओळखीचे होते.

अध्यक्षा कोमल दाते, उपाध्यक्ष अमर कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले होते. थिएट्रिक्सने सादर केलेले वटवट सावित्री नाटक पाहून उत्तर अमेरिकेतील कलाकारांची गुणवत्ता किती उच्च दर्जाची आहे याची प्रचिती आली.

मंडळी, भारतातल्या राजकारणापासून मी दोन हात लांबच असतो पण २ आठवड्यांपूर्वी गुजरातमधल्या निवडणुका पाहिल्या. मोदी प्रचंड मताधिक्यांनी निवडून आले. गेल्या काही वर्षांत नरेंद्र मोदी यांनी गुजरातचा जो कायापालट केला आहे त्यावर ’ंModi-fication ofGujrat’ या तीन शब्दातच सर्व काही आले. माझ्या सध्याच्या भारतभेटीत मोदी सरकारच्या कार्यप्रणालीबद्दल अधिक जाणून घेण्याचा मानस आहे.

मकरसंक्रातीला जसे सूर्याचे दक्षिणायनातून उत्तरायणात संक्रमण होते, त्याच प्रमाणे तुम्हा सर्वांचे उत्तरेकडे, उत्कर्षाकडे संक्रमण होवो हीच सस्नेह शुभेच्छा.

आपला,
आशिष चौघुले (अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ, उत्तर अमेरिका)

ईमेल: achaughule@gmail.com फोन: 302-559-1367