February, 2013

मंडळी, नमस्कार!

जानेवारीतील तीन आठवड्यांच्या भारतभेटीनंतर मी नुकताच अमेरिकेत परतलो. रागदारीत समेवर येतांना श्वास घेऊन पुढे गाणारा गायक, किंवा पोहताना वर येऊन श्वास घेणाऱ्या स्वीमरप्रमाणे मायदेशातली हवा फुफ्फुसात भरून ताजेतवाने होऊन नव्या जोमाने मी तुमच्याशी संवाद साधतोयं. माझी socio -economic-cultural भारतभेट उत्तम झाली.

ग्लोबल कोकणचा ब्रॅन्ड अ‍ॅम्बॅसिडर ह्या नात्याने त्या उत्सवात भाग घेतला. कोकणची रक्षा तसेच समृध्दी कशी करता येईल, जगाच्या नकाशावर कोकण कसे पोहोचवता येईल, अमेरिकेतील पुढच्या पिढीला कोकणची आणि पर्यायाने महाराष्ट्राची कशी ओळख करून देता येईल अशा विषयांवर ठोस चर्चा केली.

जागतिक मराठी परिषदेच्या शोध मराठी मनाचा या संमेलनात गेली पाच वर्षे माझी उपस्थिती आणि सहभाग आहे. यंदाचे संमेलन कुसुमाग्रजांच्या नाशिकमधे झाले. २२ वर्षांनंतर मी नाशिकला गेलो. तिथले प्रेमळ लोक, उत्तम मोकळी हवा, आदरातिथ्य, निसर्ग सर्व काही अतिशय भावलं. ह्या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे ह्यात कुठलेही ठराव नसतात. राजकीय अजेंडा नसतो. स्थानिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी कार्यक्रम असतात. जगभरातले मराठीप्रेमी या संमेलनास आवर्जून हजेरी लावतात. सातासमुद्रापलिकडे या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना तरुणाईकडे झुकणाऱ्या भारताचा उल्लेख केला. २०३०मधे अमेरिकेतले सरासरी वय ६५ तर युरोपमधील देशांमधे ७० असे असतांना भारतातले वय मात्र सरासरी ३५ असेल. युवाशक्ती दाखवण्याची हीच संधी आपल्याकडे आहे. आणि ती दाखवण्यासाठी संघटित रहाणे अतिशय महत्त्वाचे आहे. आकाशाला गवसणी घालतांना तुमचे पाय मात्र जमिनीवर असणे तेव्हढेच महत्त्वाचे आहे. आजकाल सर्वत्र मराठीचे राजकारण केले जाते. महाराष्ट्राच्या युवापिढीने मात्र तसे न करता राजकारणात मराठी आणले तर ते अधिक फायद्याचे आहे.

ग्लोबल कोकण व जागतिक मराठी परिषदेत व्यक्त केलेले माझे विचार मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडेही मांडले. दहा मिनिटांची वेळ दिलेली आमची भेट पाऊण तास रंगली. पृथ्वीराजजी अतिशय उमदे व्यक्तिमत्व! युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया (बर्कली) मधल्या शिक्षणाची झळाळी त्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून प्रतित होत होती. महाराष्ट्राच्या विकासासाठी विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यटन, उद्योग अशा विविध verticals मधे ग्लोबल महाराष्ट्राचा एक नेता या नात्याने बृहन्महाराष्ट्र मंडळ ही संस्था राज्यशासनाबरोबर काम करेल. जाताजाता केरळ पर्यटन हे जगात लोकप्रिय का? असे विचारल्यावर कळले की केरळ सरकार जाहिरातीवर २०० कोटी खर्च करते आणि महाराष्ट्र सरकार फक्त २० कोटी! विकासासाठी अनेक मुद्दे आहेत. मला खात्री आहे की जगभरातले मराठी बांधव आपला महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी मला न,च साथ देतील. राजकीय नेत्यांच्या भेटीच्या सदरात मनसेचे राज ठाकरे यांच्याशीही मौलिक चर्चा झाली.

पुण्यापासून एवढ्या जवळ राहूनही पुण्यात राहण्याचा योग गेल्या २५ वर्षात आला नव्हता. तीन दिवसांच्या पुण्याच्या वास्तव्यात पुणे तेथे काय उणे’ याची प्रचिती आली. डे,न जिमखाना क्लबमधे राहिल्यामुळे पुणे अधिकच भावले. मस्तानीचा मिल्कशेक, निसर्गमधील चमचमीत मासे, अमेरिकेतल्या हॉटेलला लाजवेल अशा मॅरीयटमधे डिनर, श्रेयसची थाळी... अगदी जीवाचे पुणे केले. बृहन्मराराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाचे महाप्रायोजक कॉसमॉस बँकने १८ जानेवारीस त्यांच्या वर्धापनदिनी बृ. म. मंडळाची पत्रकार परिषद आयोजित केली होती. पुण्याच्या वास्तव्याने भारलेला मी, मी पुण्याचाच आहे असे सांगून टाळ्या मिळवल्या. मग मी मुंबईतल्या पुण्याचा म्हणजे पार्ल्याचा आहे अशी हळूच पुस्ती जोडली. १९ तारखेला एस पी कॉलेजमधे बृ. म. मंडळ-अधिवेशनाच्या शिक्षणसमितीची सभा होती. महाराष्ट्रातल्या ख्यातनाम विद्यापीठांचे प्रतिनिधी तिथे उपस्थित होते. २१ तारखेची मुंबईतील पत्रकार परिषद महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने आयोजित केली होती. मुंबईतल्या आणि पुण्याच्या पत्रकार परिषदेला उत्तम प्रतिसाद मिळाला. अधिवेशनाचे संयोजक बाळ महाले, सहसंयोजक आदिती टेलर, अजय गल्लेवाले, बृ. म. मंडळाच्या सचिव नमिता दांडेकर हे जातीने उपस्थित होते. एकंदरीत अधिवेशनाची तयारी जोरात चालू आहे. भारतभेटीमुळे त्याला वैश्विक दृष्टिकोन मिळाला.

भारतातून अमेरिकेत परत आल्यावर तुम्हा सर्वांप्रमाणे मलाही जेट लॅग येतो. आठवड्याभरात तो निघूनही जातो. पण अमेरिकेत परतल्यावर भारतातल्या सुखद स्मृतींचा, नातेवाईक व मित्रपरिवार यांच्याबरोबर घालवलेल्या क्षणांचा लॅग कधीच जावू नये असे वाटते.

आपला,
- आशिष चौघुले (अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ, उत्तर अमेरिका)
ईमेल: achaughule@gmail.com, फोन: ३०२-५५९-१३६७