Nov 2009 Report

विलिस टॉवर वरून...

नमस्कार मंडळी,

   Windy City शिकागोमधे बृ. म. मंडळ २०११च्या अधिवेशनाचे वारेही जोरात वाहू लागले आहेत. ४२५० व्यक्तींच्या उपस्थितीची क्षमता असलेले मॅकॉर्मिक सेंटर (अधिक माहिती http://www.mccormickplace.com) हे अधिवेशन स्थळ निश्चित केले आहे. आम्हाला कल्पना आहे की बऱ्याच मंडळींना अधिवेशन अमेरिकन स्वात्रंत्रदिनाच्या (४ जुलै) सुट्टीला जोडून नसल्याचा थोडा धक्का बसेल. परंतु त्याला तसेच कारण आहे. यापूर्वीच्या काही अधिवेशनस्थळी कायमस्वरूपी नाट्यगृह नसल्यामुळे तेथे कार्यक्रमांसाठी तात्पुरते व्यासपीठ व ध्वनी यंत्रणा बसविण्यात आली होती. दुर्दैवाने ही तात्पुरती व्यवस्था काही कार्यक्रमांना अपुरी पडल्यामुळे प्रेक्षकांचे व कलाकारांचेही समाधान होऊ  शकले नाही. त्यामुळे शिकागो अधिवेशन संयोजक समिती व बृ. म. मं. कार्यकारिणीचे असे एकमत झाले की अधिवेशन अशाच ठिकाणी घ्यावे की जेथे कायम स्वरूपी ध्वनीयंत्रणेने सुसज्ज नाट्यगृह असेल. सुदैवाने मॅकॉर्मिक सेंटरमधे एरी क्राउन हे भव्य नाट्यगृह आहे.  परंतु ४ जुलै २०११  रोजी ही वास्तू उपलब्ध नसल्यामुळे बृ. म. मंडळ २०११ चे अधिवेशन शुक्रवार, जुलै २२, ते रविवार जुलै २४, २०११  होईल. आनंदाची गोष्ट ही की त्यामुळे मुख्य कार्यक्रमांचा संपूर्ण आस्वाद आता सर्व रसिकांना घेता येईल.

   शिकागो अधिवेशन संयोजनास उत्साही सुरवात झाली असून स्वयंसेवकांची संख्या १००वर तसेच देणगीदारांची संख्याही वाढत असून आतापर्यंत ४१,००० डॉलर्सचा निधी जमा झालेला आहे. अधिवेशनासंबंधित विविध समितींवर  अध्यक्षांच्या नेमणूका झाल्या असून समितीवर स्वयंसेवकांची निवडही सुरू केली आहे.

                                                                श्रीधर जोशी (शिकागो) spjoshi@excite.com