Oct 2009 Report

विलिस टॉवर वरून...

नमस्कार मंडळी,

   काय मंडळी चक्रावलात ना? विश्वविख्यात सीअर्स टॉवरचे नांव बदलून आता च, विलिस टॉवर झाले आहे हे फारच कमी लोकांना माहिती असेल. अहो, पण नावात काय आहे? सीअर्स म्हणा, किंवा विलिस म्हणा त्याची उंची तर कमी होत नाही? तेव्हा त्या विलिस टॉवर वरून २०११ सालच्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाची माहिती तुम्हाला देण्यासाठी ह्या सदराचा प्रपंच! 

       २०११ च्या बृ. म. मंडळाच्या अधिवेशनाचे पडघम लेक मिशिगन-तीरी वाजू लागले आहेत. वेगवेगळ्या समित्यांची स्थापना व त्यांच्या अध्यक्षपदाच्या नेमणूका सुरू झाल्या आहेत. स्वयंसेवकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अधिवेशनाचे स्थळ ठरले आहे- शिकागोतील जगप्रसिध्द मेकॉर्मिक सेंटर! तब्बल ४२०० लोकांची आसन क्षमता असलेले भव्य असे एरी  क्राऊन थिएटर याच वास्तूत आहे. तेव्हा त्या वास्तूला साजेसे व आपल्या परंपरेशी व संस्कृतीशी इमान राखेल असे अधिवेशन भरविण्याचा आमचा मानस आहे. तेव्हा फिलाडेल्फियास नुकत्याच झालेल्या अधिवेशनाच्या संयोजनामधून आपल्याला काय शिकता येईल ह्या जिज्ञासेने शिकागो महाराष्ट्र मंडळातून श्री नितीन जोशी यांच्या नेतृत्वाखाली तेरा जणांचे पथक लेबर डेच्या रजेमध्ये फिलाडेल्फियास जाऊन आले.

      फिलाडेल्फिया अधिवेशनाचे प्रमुख संयोजक श्री मुकुंद कुटे यांनी २०११ च्या शिकागो अधिवेशनाचे प्रमुख संयोजक श्री नितीन जोशी यांचा शाल देऊन सत्कर केला. श्री कुटे व त्यांच्या सहकार्यांनी अधिवेशन आयोजनासंबंधी सविस्तर महिती पुरवण्यासाठी दोन सत्रांची योजना केली होती. सकाळच्या पहिल्या सत्रात उपस्थित कार्यकर्त्यांची ओळख  व आयोजनाच्या एकंदर आवाक्याचा आढावा झाला. अधिवेशनासाठी आवश्यक असणाऱ्या समित्या, त्यांची कार्यप्रणाली, अधिकार व कर्तव्ये या विषयी विचार मांडले गेले. कार्यकर्त्यांची निवड, त्यांना दिलेले प्रोत्साहन, कामांची जबाबदारी अशा अनेक गोष्टीचा उहापोह करण्यात आला. त्यांच्या कार्यकारिणीला आलेले बरे वाईट अनुभव, व त्यातून मिळालेले धडे, करारपत्रावर सही करण्यापूर्वी घेण्याची दक्षता, कार्यक्रमाच्या ठिकाणासंबंधी तसेच भोजन, प्रवास, रहाण्याची व्यवस्था करतांना येणाऱ्या विविध अडचणी व अन्य महत्वाच्या विषयांवरही खूपच उपयुक्त माहिती मिळाली. उत्तम भोजन देण्यासाठी कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला व त्यांचे महत्वही ठळकपणे मांडले. त्यानंतर श्री योगेश दाते यांनी जमाखर्चाचे अंदाजपत्रक, उत्पन्नाची साधने, स्त्रोत, उत्पन्न वाढविण्यासाठी योजलेले उपाय, खर्चावरील नियंत्रण, अर्थ समितीच्या जबाबदाऱ्या इ. विषयी जाणिव व मार्गदर्शन केले. बृ. म. मंडळाने (श्री मिलिंद रानडे यांच्या मदतीने) दिलेल्या खास मऱ्हाटी जेवणाचा आस्वाद घेऊन मंडळी दुसऱ्या सत्राकडे वळली.

   दुसरे सदर वैयक्तिक पातळीवर प्रश्नोत्तरे, आलेल्या अडचणी त्यांची कारणे व त्यावर केलेले उपाय, यासाठी राखून ठेवले होते. सकाळच्या सत्रात उल्लेखलेल्या कामांची अधिक माहिती या सत्रात  मिळविता आली. सौ. सुजाता देशमुख (मुलांचे कार्यक्रम), श्री सचिन प्रभुदेसाई (हॉटेल व प्रवास), श्री संजीव देशमुख (Expo), श्री किरण जोगळेकर (कार्यक्रम समिती) यांनी त्यांच्या विभागांच्या कार्यांची माहिती दिली. सौ. गौतमी जोगळेकर (व्हीसा) यांनी  दिलेली माहिती तसेच श्री मंदार जोगळेकर यांचे Registration System माहितीसंकलन व वितरण याबद्दलचे प्रात्यक्षिक फारच उद्बोधक व  माहितीपूर्ण होते.

     ह्या दोन्ही सत्रांसाठी बृ. म. मंडळाच्या अध्यक्षा सौ. माधुरी जोशी, सल्लागार समिती-सदस्य श्री आनंद जोशी व वृत्त संपादन सल्लागार श्री मोहन रानडे यांची उपस्थिती व मार्गदर्शनही लाभले.

श्री मिलिंद पानट यांनी फिलाडेल्फिया अधिवेशन समितीचे आभार मानले आणि परतीच्या वाटेवर श्री व्यंकटेश्वराचे आशिर्वाद घेऊन मंडळी शिकागोच्या वाटेला लागली.

                                                     मिलिंद पानट, शिकागो (pmilind@yahoo.com)