Mar 2017

अध्यक्षीय

नमस्कार मंडळी,

फेब्रुवारीच्या २५ तारखेला डेट्रॉइटला अधिवेशनाच्या सर्व स्वयंसेवकांच्या सभेला जाण्याचा योग आला आणि पुन्हा एकदा एक संतवचन आठवलं, ‘पाण्यामध्ये मासा, श्वास घेई कैसा, जावे त्याच्या वंशा, तेंव्हा कळे!’

सुमारे दोनशे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पाच तास चाललेल्या ह्या सभेत अधिवेशनाच्या आतापर्यंतच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी सर्वच उत्साही आणि कार्यक्षम समिती प्रमुखांनी आपले विचार मांडले. २०११च्या शिकागो अधिवेशनाचा मी प्रमुख संयोजक होतो त्यामुळे सगळ्या जुन्या आठवणींची उजळणी होत होती. मला नेहमी असं वाटतं की पुढची पिढी आपल्यापेक्षा जास्त हुशार किंवा जाणती (mature) आहे. अधिवेशनाला अजून चार महिने असतांना ही मंडळी तयारीत खूपच पुढे आहेत ह्याचा प्रत्यय आला. आपापल्या समितीच्या कामाचं स्वरूप आणि कार्यवाही करण्याच्या तयारीचे टप्पे सादर करणाऱ्या प्रत्येकाने त्या विषयी केलेला सखोल विचार आणि मेहनत मला प्रकर्षाने जाणवली. अधिवेशनात समाविष्ट होणाऱ्या प्रत्येक बारीकसारीक जबाबदाऱ्या आपले इतर सर्व व्याप सांभाळून, "जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ" ठेऊन करण्याची कसरत करतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो हे प्रमुख संयोजकांनी प्रत्येक स्वयंसेवकाच्या मनावर बिंबवलं आहे.

अधिवेशनाच्या आयोजनातले काही ठळक विशेष म्हणजे मुलांच्या कार्यक्रमांची संपूर्ण आखणी सर्वत: मुलांनीच केली आहे त्यामुळे अधिवेशनाला येणाऱ्या सर्व मुलांसाठी हा एक वेगळाच आणि खास आनंदाचा अनुभव ठरेल अशी माझी खात्री आहे. भारतातून येणारे कार्यक्रम आणि उत्तर अमेरिकेतल्या लोकांनी सादर केलेले कार्यक्रम ह्यांचं काय प्रमाण असावं हा एक कायम चर्चेचा विषय असतो. यंदाच्या अधिवेशनात दोन त्रितीयांश कार्यक्रम उत्तर अमेरिकेतल्या कलाकारांचे आहेत! सुमारे १६० प्रवेशिकांतून ३० कार्यक्रम निवडणे ही सोपी गोष्ट नाही पण अधिवेशनात सादर होणाऱ्या सर्व कार्यक्रमांमध्ये वैविध्य, गुणवत्ता आणि जास्तीतजास्त कलाकारांना संधी ह्या सर्वांचा साकल्याने विचार करून कार्यक्रम समितीने ही निवड केली आहे हे आवर्जून नमूद करावेसे वाटते. भोजनाचा बेत आणि व्यवस्था हासुद्धा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. भोजन समितीने पाकशास्त्रातल्या मूलभूत नियमांचा शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेला विचार (म्हणजे डोळे, नाक आणि जिव्हा ह्या क्रमाने भोजनाचा आस्वाद घेण्याची आपली नैसर्गिक प्रतिक्रिया!) मला खूपच भावला! ह्याशिवाय नावनोंदणी प्रक्रिया, रंगमंच व्यवस्था, अधिवेशन- स्थळाची सजावट, निधीसंकलन ह्या अनेक महत्त्वाच्या कार्यांचा सुद्धा आढावा घेण्यात आला. अधिवेशनाच्या आदल्या दिवशी CME, Business Conference आणि उत्तररंग ह्यांची चर्चासत्रे असतात. यंदाच्या Biz-Con मध्ये स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी विशेष मार्गदर्शन आयोजित केले आहे. सर्वसाधारणपणे हे चर्चासत्र स्वतंत्र व्यवसाय असणाऱ्या लोकांसाठी

असते. परंतु ह्या वेळेस तीन समांतर ट्रॅक्स करून जास्तीत जास्त व्यावसायिकांनी ह्याचा लाभ घेऊन networking/connections

करावे हा उद्देश ठेवला आहे. Shifting Gears track मध्ये नोकरीत असलेल्या व्यक्तींना career transformationचा आणि

स्वतःचा उद्योग सुरू करण्याबद्दलचा सल्ला आणि career blue print बनवता येईल. Entrepreneurs Empowered Track मध्ये

स्वतःचा उदयोग सुरू केलेल्या व्यक्तींना त्यांचा business growth blue print बनवता येईल. सर्वात महत्वाचे म्हणजे तिसऱ्या B2B Bridge track मध्ये matured businesses ना नवीन business connections ची सुवर्ण संधी मिळेल.

उत्तररंगच्या संयोजकांनी कार्यक्रमाची उत्तम आखणी केली आहे आणि आजवरचा प्रतिसाद बघता विक्रमी संख्येने लोक उपस्थित राहतील अशी माझी खात्री आहे. अधिवेशनाच्या संकेतस्थळावर अधिक माहिती आहेच. मंडळी, चला तर मग अधिवेशनाला येण्याची तयारी करा. आपल्याला एक उत्कृष्ट अनुभव देण्यासाठी डेट्रॉइटकर सज्ज आहेत. धन्यवाद

- नितीन जोशी (अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ, उत्तर अमेरिका)