Feb 2017

दोन वर्षांत अनेकांनी घेतलेल्या कष्टाचे, केलेल्या तयारीचे फलित म्हणजे तीन दिवसांचे बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अधिवेशन! एवढ्या सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे, अनेक प्रेक्षकांच्या, कलाकारांच्या, मान्यवरांच्या उपस्थितीमुळे, तो भव्य-दिव्य समारंभ अगदी दिमाखात पार पडतो. आणि मग मागे उरतात, त्या केवळ आठवणी! पण दोन वर्षांपूर्वी हे अधिवेशन कोणत्या उद्दिष्टाने हाती घेतलं गेलं, किंवा ह्या अधिवेशनाचा गाभा काय होता? आणि मग त्या गाभ्याभोवती इतर गोष्टी कशा रचल्या गेल्या? ज्या उद्दिष्टाने हे अधिवेशन पार पडलं, त्याबद्दल लेखकांची, विचारवंतांची काय मते आहेत? जे मुख्य कलाकार आणि इतर मान्यवर भारतातून अधिवेशनाला आले होते, त्यांचं ह्या अधिवेशनाबद्दल काय मत होतं? हे जाणून घेतल्यास कदाचित ह्या सगळ्या माहितीचा उपयोग पुढच्या अधिवेशनांना होऊ शकतो. उपस्थितांनादेखील ह्याबद्द्दल वाचायला बरीच उत्सुकता असते. म्हणूनच, आपण "स्मरणिका" स्वरूपात अधिवेशनाचा एक अंक तयार करतो. अधिवेशनाला येणाऱ्या प्रत्येक कुटुंबास ही स्मरणिका सप्रेम भेट म्हणून दिली जाते.

आता ह्या स्मरणिकेत काय असतं? तर निरनिराळ्या विषयांवरचे लेख असतात, कविता असतात, मुलाखती असतात. कथा, अनुभव, विचार, प्रवासवर्णनं, व्यंगचित्रं, विडंबनं असतात. जगभरातला कुठलाही लेखक त्यांचं साहित्य पाठवू शकतो. त्यासाठी वयाचं बंधन नसतं. स्मरणिकेसाठी एक संपादक समिती असते, जिचं काम ‘अधिकाधिक वाचनीय आणि रंजक साहित्य जमवणं’ आणि ‘स्मरणिकेचा दर्जा उत्तम ठेवणं’, हे असतं.

आपल्या ह्या अधिवेशनाचं घोषवाक्य आहे, 'मंत्र श्रमाचा, ध्यास गतीचा, गर्व मराठी संस्कृतीचा'. प्रगतीचा ध्यास मनात ठेवून, मनापासून कष्ट करणारी आपण मराठी माणसं. पण २१ व्या शतकाच्या गतीशी बरोबरी साधताना संस्कृतीचा हात आपल्या हातातून सुटत तर नाही ना चाललेला? किंवा ह्याच्या अगदी विरुद्ध असं म्हणतात 'तुटल्यावर जुळतं ते नाळेचं नातं!' ह्याप्रमाणे महाराष्ट्रापासून दूर आल्यामुळे आपण आपल्या संस्कृतीच्या जास्त जवळ आलो आहोत का?

नृत्य-नाटक-गायन ह्या कलाप्रकारांचा आपण अधिक रसिकतेने आस्वाद घ्यायला लागलो आहोत का? आपण भारताबद्दल 'विविधतेत एकता' असं म्हणतो. आपल्या विविधतेचा आपल्याला अभिमान वाटतो. मग इतकी वर्षे अमेरिकेत राहून 'भारतीय' असल्याबरोबर 'मराठी' म्हणूनदेखील आपली ओळख ह्या समाजात असावी का?

आपल्या १८ व्या अधिवेशनाच्या स्मरणिकेची तयारी आपण सुरू केली आहे, आणि ह्यावेळी लेखांचे विषय आहेत:

· प्रगतीची गती आणि संस्कृतीशी नातं जपताना

· गरज 'मराठी' ओळख निर्माण करण्याची

· मराठी मनातून टिपलेल्या नजीकच्या काळातल्या महत्वपूर्ण वैश्विक घडामोडींवरचे विवरण - यामध्ये अमेरिकन निवडणूक २०१६, भारतीय विमुद्रीकरण (Demonetization), दहशतवाद यांसारखे विषय येऊ शकतील.

· (लहान व तरुण मुलामुलींसाठी):

- अमेरिकन मराठीपण (Being American Marathi),

- Me Marathi, My Marathi

- Overt / Covert Racism

ह्या व्यतिरिक्त इतरही विषयांवर साहित्य पाठवायची लेखकांना मुभा आहे. स्मरणिकेच्या विषयांच्या जवळ जाणाऱ्या साहित्याला प्राधान्य दिलं जाईल. पण त्याहीपेक्षा ‘साहित्याचा दर्जा’ हा प्रमुख निकष मानला जाईल. साहित्याची कमाल शब्दसंख्या १२००-१५०० असावी. साहित्य पाठवायची शेवटची तारीख: ३१ मार्च, २०१७, पाठविण्यासाठी ईपत्ता: sahitya@bmm2017.org स्मरणिकेसंबधी सविस्तर माहिती आणि मार्गदर्शक नियम-

https://www.bmm2017.org/index.php/smaranika/ह्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. कागद, पेन आणि लॅपटॉप तयार ठेवा. मेंदूची चक्रं सुरू

ठेवा! वाट बघतोय, उत्तमोत्तम साहित्याची!

- सुशांत खोपकर (डेट्रॉइट, मिशिगन)