Feb 2017

नमस्कार मंडळी,

कवी गुलज़ार एका गज़ल मध्ये म्हणतात, "एक पुराना मौसम लौटा याद भरी पुरवाई भी, ऐसा तो कम ही होता है वह भी हो तनहाई भी" तिच्या जुन्या आठवणींची झुळूक आली, खरंतर रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात असं फार कमी वेळा होतं. पण आज ती इथेच आहे असा भास झाला आणि त्याच बरोबर ती आता नाही ह्या वास्तवाच्या जाणीवेने एकाकीपण समोर ठाकलं! आपल्या जोडीदाराबरोबर सुखी आणि चिरंतन आयुष्याची स्वप्न आपण सर्वजणच बघतो. बहुतेकांची ही स्वप्न पूर्तत्वाला जातात सुद्धा पण सगळेच इतके नशीबवान नसतात. दुर्दैवाने काहींच्या वाट्याला चुकीचं दान पडलं असतं, काहींचं सुख अचानक हिरावून घेतलं जातं तर काहींच्या आयुष्यात तो योगच आला नसतो. काहीही असलं तरी परदेशातल्या ह्या वास्तव्यात आपण आणि आपला जोडीदार हेच समीकरण वास्तववादी आहे हे आपण सर्व जाणतो. एकत्र कुटुंब पद्धत आता भारतातही अभावानेच सापडते. इथे तर पक्षांच्या पिलांसारखी आपली मुलं उडायला शिकली की घरट्यात परत कधीच येत नाहीत हे आपल्या सर्वांसाठी पाश्चिमात्य आयुष्याचं वास्तव आहे. त्याच बरोबर आपणही त्यांच्या सोबतीने त्यांच्या नवीन घरट्यात कायमचे राहू शकत नाही हे सुद्धा सत्य आहे. ज्यांचा जीवनसाथी अकाली हरपला आहे किंवा काही अपरीहार्य कारणांमुळे दुरावला आहे अथवा यशाच्या पाठी पळताना ज्यांनी तरुण वयात ह्या बाबतीत विचारच केलेला नाहीये अशा मध्यमवयीन किंवा वयस्कर लोकांसाठी पुढचं आयुष्य एकाकी कसं घालवायचं ही एक समस्या आहे. आपल्या समाजात अशा अनेक व्यक्ती असतील. आयुष्याच्या मध्यावर किंवा उत्तररंगात एक मित्र, एक जोडीदार, एक आधार म्हणून कोणीतरी जवळचं असणं अत्यन्त आवश्यक आहे, "संध्याछाया भिवविती हृदया" अशी वेळ जेंव्हा येते तेंव्हा ही जाणीव अधिक प्रकर्षाने होते. एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण एकत्रितपणे ह्यासाठी काही करू शकतो का?

बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनांत तरुणांसाठी “स्नेहबंध” हा भेटीगाठींचा कार्यक्रम नेहमीच असतो पण २०१७ च्या अधिवेशनात प्रौढांसाठी अशाच प्रकारचा "मनोमीलन – A New Beginning" कार्यक्रम आयोजित करण्याचे संयोजकांनी ठरवले आहे. डॉ. सुभाष केळकर ह्यांची ही संकल्पना अधिवेशनाच्या प्रमुख संयोजिका अंजली अंतुरकर आणि कार्यक्रम समितीचे हर्षद अण्णिगेरी, अर्चना सोमणे, स्मिता जोशी ह्यांनी लगेच उचलून धरली. मलाही ती स्वागतार्ह वाटली. अतिशय अनौपचारिक तरीही सुसूत्र स्वरूपाचा हा कार्यक्रम एका मोठ्या सामाजिक समस्येचं निराकरण करायला हातभार लावू शकेल अशी आमची आशा आहे. लवकरच अधिवेशनाच्या संकेत स्थळावर आणि इ-मेल द्वारा संयोजक आपल्याशी संपर्क साधतील. आपल्या परिचयाच्या अशा व्यक्ती असतील तर त्यांना ह्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्या कारण काही लोकांना संकोच वाटणे स्वाभाविक आहे. कुठलाही विकल्प न ठेवता मोकळ्या मनाने त्यांना यायला सांगा. ह्यात सहानुभूतीचा भाग नसून आपलं वैयक्तिक आयुष्य परिपूर्ण करण्याची एक संधी म्हणून जर आपण ह्याकडे पाहू शकलात तर हा एक आनंददायी अनुभव ठरू शकतो. नावनोन्दणी करण्यापूर्वी सर्वांना कार्यक्रमाचं निश्चित स्वरूप काय असेल ह्याची संपूर्ण कल्पना आम्ही देऊ शकतो. त्यासाठी आमच्याशी जरूर संपर्क साधा. काही लोकांसाठी भावनिक दृष्ट्या ही खूप नाजूक आणि वैयक्तिक गोष्ट आहे ह्याची आम्हाला पूर्णपणे जाणीव आहे त्यामुळे ह्या बाबतीतली आवश्यक ती गोपनीयता आणि कायदेशीर जबाबदारी पाळण्याचा आमचा कसोशीने प्रयत्न असेल. सर्व मंडळांच्या अध्यक्षांना आणि बृ.म.मं. प्रतिनिधींना माझी विनंती आहे की आपल्या समाजातल्या लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा.

बराय तर मंडळी, शिशिर ऋतूच्या आगमनाने गारठलेली पृथ्वी आता वसंत ऋतूची प्रतीक्षा करतेय, आपणही सर्व वसंताच्या आगमनाची वाट पाहूया.

धन्यवाद,

नितीन जोशी, अध्यक्ष-बृहन्महाराष्ट्र मंडळ