Oct 2016

नमस्कार मंडळी,

मी आणि बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या (बृ.म.मं.) सचिव सोना भिडे ह्यांना आपल्या मंडळाच्या वेबसाईटवरील ‘Contact Us form’ द्वारा अनेक ईमेल्स येत असतात. अगदी, आमचे अमेरिकेत कार्यक्रम ठरवा पासून ते आमच्या मुलाचे/मुलीचे लग्न जमवा पर्यंत! ह्या सगळ्या ईमेल्सचा आणि अर्थात आमच्या उत्तरांचा हिशोब मांडायचा ठरवला तर एक छानसा सत्यकथा- संग्रह होईल असं मला वाटतं. आम्ही आमच्यापरीने जसे जमेल तसे सहाय्य करण्याचा प्रयत्न करतो, पण काही विचारणा आमच्या आवाक्याबाहेरच्या तर काही अवास्तव असल्याने आमचा नाईलाज होतो. काहीशी अशीच एक विनंती काही दिवसांपूर्वी आमच्याकडे आली. एका मराठी विद्यार्थिनीला तिच्या बरोबरच्या मुलींबरोबर अनेक कारणांमुळे राहणे अशक्य झाले आहे आणि तिला मदतीची नितांत गरज आहे असं तिने लिहिलं. मी माझा फोन नंबर देऊन त्वरित संपर्क साधायला सांगितला. तिच्या तोंडून सगळं ऐकल्यावर मला सहाजिकच प्रश्न पडला, की ह्या मुलीला तिच्या २००० मैल दूर असलेल्या गावात मी काय मदत करू शकतो? सुदैवाने स्थानिक महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष आणि त्यांचे सहकारी यांनी ह्या प्रकरणात त्वरित लक्ष घातलं. ती मुलगी, तिचे भारतातले चिंताग्रस्त वडील आणि इथले दोन स्वयंसेवक ह्यांच्याशी वारंवार बोलून मी माझ्यापरीने शेवटपर्यंत ह्या प्रकरणाचा पाठपुरावा केला. अर्थात प्रत्यक्ष सर्व मदत स्थानिक मंडळाच्या त्या दोन कार्यकर्त्यांनीच केली, पण अखेरीस त्या मुलीची दुसरी व्यवस्था लागेपर्यंत माझी काळजी संपली नव्हती.

मंडळी, हे फक्त एक उदाहरण आहे. मला खात्री आहे, अशाच किंवा याहीपेक्षा वाईट परिस्थितीतल्या व्यक्तींना आपल्यापैकी अनेकांनी वेळोवेळी मदत केली असेल. अपघात, गंभीर आजार, मृत्यू अशा अनेक प्रसंगांना सामोरे गेलेल्या व्यक्तींना आणि कुटुंबांना आपल्या समाजाने कायम सहाय्य केल्याची अनेक उदाहरणे माझ्यासमोर आहेत. आपल्या समाजातल्या लोकांना विशेषत: परदेशात नवीन आलेल्या लोकांना तर अनेक प्रश्न असतात, आणि योग्य मार्गदर्शनाअभावी इथे म्हणतात तसे, “They learn the hard way.” अगदी प्लंबरपासून वकील शोधण्यापर्यंत सर्वच बाबतीत आपण आपल्या मित्रमंडळींवर अवलंबून असतो. अशा प्रकारची सर्व माहिती किंवा विविध विषयातले सल्ले अर्थात इंटरनेटवर उपलब्ध असतात, पण आपण आपल्या समाजासाठी गावोगावी अशी काहीतरी यंत्रणा सुरू करू शकतो का? फिलाडेल्फियाचे मंदार जोगळेकर ह्यांनी ‘WithinContacts’ नावाच्या एका संकल्पनेबद्दल माझ्याशी चर्चा केली आहे, ज्यायोगे एका गावातली सर्व मराठी मंडळी सामूहिकपणे अनेक उपयुक्त विषयांची माहिती एकत्रितपणे संकलित करू शकतील (अर्थात आपण What’s App वर share करीत असलेले विनोद आणि श्रवणीय किंवा प्रेक्षणीय माहिती हे सर्वही तसेच चालू ठेवावे!) आणि त्याचा लाभ सगळ्यांनाच होईल. या संकल्पनेच्या कार्यवाहीबद्दल अधिक माहिती देण्याची मी मंदारला विनंती करणार आहे. आपल्यापैकी कोणाकडे अशा प्रकारच्या योजना कार्यान्वित किंवा संकल्पित असतील तर आम्हाला जरूर कळवा. आपल्या लोकांच्या वाढत्या गरजा आपण स्वावलंबनाने पूर्ण करू शकलो तरच आपण स्वत:ला “समाज” म्हणवू शकतो असं मला प्रांजळपणे वाटतं. तात्पर्य काय? तर, “एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ” हे संतवचन आजही तितकंच उपयुक्त आहे.

आगामी दसरा व दीपावली- प्रित्यर्थ तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा! भेटूया पुन्हा नोव्हेंबरच्या दिवाळी अंकातून!

- नितीन जोशी (अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ, उत्तर अमेरिका)