Aug 2016

नमस्कार मंडळी,

गेल्या महिन्यात अमेरिकेत आणि एकूण जगभरातच घडलेल्या हिंसक घटनांचं भयंकर तांडव पाहून मन खूपच उद्विग्न झालं. एकीकडे प्रगतीचे नवीन उच्चांक गाठणारा मानव अजून मनातलं पशुत्व विसरू शकत नाही, आणि अशा भयानक कृत्यांना प्रवृत्त का होतो हेच अनाकलनीय आहे. शायर शहरयार विचारतो तोच प्रश्न मलापण सतावतो, “सीनेमें जलन आँखोंमें तूफ़ानसा क्यूँ है, इस शहरमे हर शख्स परेशानसा क्यूँ है? एकीकडे हिंसाचार तर दुसरीकडे मर मर राबून कष्ट करणारा मजूर शेतकरी! त्यालाही कोणी वाली उरला नाही अशी भारतात अनेक ठिकाणी अजूनही परिस्थिती आहे. जगातला दहशतवाद थांबविण्याची क्षमता आपल्यासारख्या सामान्य माणसांत नसली; तरी घाम गाळून काम करणाऱ्या गरीब शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणं हे आपल्याला सहज शक्य आहे. अशाच काही विचारांनी प्रेरित होऊन बे एरिया परिसरातल्या “रंगमंच” संस्थेने एका भव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून “नाम” संस्थेसाठी निधीसंकलन करण्याची योजना आखली. बृहन्महाराष्ट्र मंडळाने (बृ. म. मं.) गेल्या वर्षी असाच उपक्रम हाती घेतल्यामुळे “रंगमंच” तर्फे श्री माधव कऱ्हाडे आणि सौ. स्मिता कऱ्हाडे ह्यांनी जेंव्हा माझ्याशी संपर्क साधला, तेंव्हा बृ. म. मं. त्यांच्या ह्या कार्याला सर्वतोपरी सहकार्य देईल अशी आमच्या कार्यकारिणीने त्यांना ग्वाही दिली. “रंगमंच” निर्मित सादर केलेल्या “बसंतचे लग्न” आणि “गीत रामायण” नृत्य नाटिकेसंबंधी वृत्ताच्या ह्या अंकात (पृष्ठ क्र. ५वर) तुम्ही वाचालच, पण आश्चर्याची आणि आनंदाची गोष्ट अशी, की ह्या निधी-संकलनातून ३५ हजार डॉलर्स इतकी भरघोस रक्कम जमा झाली आहे. रंगमंच संस्थेवरचं प्रेम आणि बृ. म. मंडळावरचा विश्वास सॅन होजे मधल्या रसिकांनी सिद्ध केला, आणि आपल्या दातृत्वाची ओळख पटवून दिली. मराठी मंडळांच्या आणि उत्तर अमेरिकेतल्या मराठी बांधवांच्या वतीने कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या शंभरहून अधिक कलाकारांना आणि देणगीदार प्रेक्षकांना मानाचा मुजरा!

ह्या दोन्ही कार्यक्रमांचे सूत्रधार जरी कऱ्हाडे दाम्पत्य असले तरी शिल्पकार ह्या नात्याने ‘गीत रामायण’चे संगीत, नृत्य-दिग्दर्शक आणि वेशभूषाकार म्हणून मनोज ताम्हनकर, सतीश तारे, हेमाली गोंधळेकर, प्रतिमा शाह, अर्चना पाटकर, राधिका अधिकारी, तृप्ती भालेराव, वृषाली मुंढे-जावळे, श्रद्धा जोगळेकर आणि सेजल पोरवाल ह्यांचा आवर्जून उल्लेख करणे आवश्यक आहे. त्याच प्रमाणे “बसंतचे लग्न”मधे श्री. सतीश तारे (तबला), श्री. नचिकेत याक्कुंडी (गायन), सौ. सुपर्णा डांगी (गायन), सौ. मधुवंती भिडे (गायन), श्री. प्रसाद जोगळेकर (सतार), श्री. प्रसाद भांडारकर (बासरी), श्री सतीश गदगकर (व्हायोलिन) आणि मनोज ताम्हनकर (पेटी) ह्या मंडळींसह रोचन याक्कुंडी (गायन), प्रीति ताम्हनकर (गायन), कुणाल भांडारकर (बासरी) आणि आशिष तारे (तबला) अशा युवा कलाकारांचा सहभाग मोलाचा ठरला. याचबरोबर निधी-संकलनाचे कार्य करणारे अनिता कांत, संजीव रेडकर, पंढरी माने, जगदीश डांगी, हेमंत हब्बू आणि लक्ष्मण आपटे हेसुद्धा ह्या यशाचे धनी आहेत, ह्या सर्वांचे मन:पूर्वक आभार!

ह्या उपक्रमापासून प्रेरणा घेऊन बृ. म. मं., रंगमंच आणि महाराष्ट्र फाऊंडेशन ह्या तीन संस्था “सेतू बांधा रे” नावाचा एक प्रकल्प हाती घेण्याच्या विचारात आहेत; ज्यायोगे नजिकच्या आणि भविष्यकाळातसुद्धा असा निधी संकलित करून तो इतर अनेक चांगल्या सेवाभावी योजनांना पुरवता येईल. मंडळाचे कार्य केवळ सांस्कृतिक पातळीवर मर्यादित न ठेवता त्याला समाजकार्याची जोड देणे हाच मुख्य हेतू यात आहे. आपण सर्वजण आम्हाला आशीर्वाद द्याल, आणि आपल्या सहकार्याने उपकृत कराल अशी खात्री आहे. आपला

- नितीन जोशी (अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ, उत्तर अमेरिका)