May 2016

अध्यक्षीय

नमस्कार मंडळी,

एप्रिल १५-१७ रोजी संपन्न झालेल्या युरोपीय मराठी संमेलनात सहभागी होण्यासाठी नेदरलॅंड्समधे अल्मेलो ह्या टुमदार गावी जाण्याचा योग गेल्या महिन्यात आला. सुमारे ४५० लोकांच्या उपस्थितीत पार पडलेला हा सोहळा तसं पाहायला गेलं तर आपल्याकडच्या अनेक मंडळांच्या नेहमीच्या कार्यक्रमांपेक्षासुद्धा लहान प्रमाणातला; पण युरोपच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या उत्साही लोकांनी त्याला एका उत्सवाचं स्वरूप प्राप्त करून दिलं. “थिएटर हॉटेल” नावाच्या आणि ते नाव यथार्थ करणाऱ्या वास्तूत हे संमेलन संपन्न झालं. हॉटेलमध्येच थिएटर असल्याने सगळीच सोय एका जागी होती. अल्मेलो गाव छोटंसं असलं, तरी ह्या “थिएटर हॉटेल”मध्ये वर्षभर अनेक कार्यक्रम सादर होतात, आणि गावोगावचे लोक ते पाहायला येतात ह्याची गम्मत वाटली. संमेलनाचे प्रमुख संयोजक श्री गिरीश ठाकूर, सौ. वृंदा ठाकूर आणि त्यांचे अनेक सहकारी स्वयंसेवक ह्यांच्या दोन वर्षांच्या परिश्रमाचे फलित म्हणजे हे संमेलन. एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, की आलेले सर्व अतिथी ह्याची मनोमन दखल घेऊन अतिशय समंजसपणे कार्यक्रमांचा आस्वाद घेत होते. विशेष कौतुकाची गोष्ट म्हणजे वृंदा ठाकूर आणि त्यांच्या भोजन समितीच्या मंडळींनी मराठी पाककलेचे धडे देऊन तिथल्या डच बल्लवांकडून अगदी सुग्रास मराठी जेवण (मालवणी आणि कोल्हापुरी चिकन सहित!) बनवून घेतले होते. सर्व कार्यक्रम एकाच सभागृहात असल्याने संयोजनात खूपच सुटसुटीतपणा आला तरीही वेळेच्या बाबतीतला गोंधळ काही ठिकाणी निश्चित जाणवला. भारतातून आलेल्या कलाकारांचे दर्जेदार कार्यक्रम आणि युरोपमधल्या कलावंतांचे विविध गुणदर्शन ह्याचा छान समतोल आयोजकांनी साधला होता. प्रेक्षक सर्वच कार्यक्रमांना मनापासून दाद देत होते. महेश मांजरेकर निर्मित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित “व्यक्ती आणि वल्ली” हे प्रमुख आकर्षण मराठी रंगमंचावरच्या प्रतिथयश कलावंतांनी गाजवलं. ह्या शिवाय गुरु ठाकूर ह्यांच्या भावपूर्ण गीतांचा “कसे गीत झाले”, भीमराव पांचाळे ह्यांचे गझल गायन, सुमित राघवन ह्या गुणी कलाकाराचा एकपात्री प्रयोग, सौ. मंगला खाडिलकरांचा “आरसा” असे विविध कार्यक्रम, आणि युरोप मधल्या कलाकारांचे नृत्य, गायन, एकांकिका, काव्यवाचन असे अनेक दर्जेदार कार्यक्रमसुद्धा झाले. लेखक आणि सुप्रसिद्ध समाजसेवक श्री. अनिल अवचट ह्यांनी संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं. त्यांच्या अष्टपैलुत्वाची झलक त्यांच्या मुलाखतीतून निश्चितच झाली.

युरोपीय संमेलनाचे संयोजक श्री गिरीश ठाकूर आणि सौ. वृंदा ठाकूर ह्यांच्या संपर्कात मी आधीपासून होतो आणि त्यांनी आवर्जून उत्तर अमेरिकेतल्या मराठी जनतेच्या वतीने मला संमेलनात प्रेक्षकांशी रंगमंचावरून संवाद साधण्याची संधी दिली. माझ्या सोबत संमेलनाला उपस्थित असलेल्या मंडळाच्या सचिव सौ. सोना भिडे आणि २०१७च्या अधिवेशन समितीचे एक प्रतिनिधी श्री नितीन अंतुरकर ह्यांच्यासमवेत आम्ही सर्व प्रेक्षकांना आपल्या अधिवेशनाचे आमंत्रण दिले. आम्हाला दिलेल्या ह्या संधीबद्दल संयोजकांचे हार्दिक आभार. “आनंदयात्री” संकल्पनेचं हे संस्मरणीय संमेलन निश्चितच एक सुखद अनुभव होता.

मंडळी, आपल्या २०१७च्या अधिवेशनाची तयारीसुद्धा जोमाने सुरू आहे. “गंधर्व” कार्यक्रमाचा दौरा ठिकठिकाणचे समर्थ संयोजक आणि रसिक प्रेक्षक ह्यांच्यामुळे अतिशय उत्तम रीतीने होतो आहे. वसंतऋतूच्या आगमनाने तुम्हा सर्वांना उत्साहित केलं असेलच. चला, आता ‘मेमोरिअल डे’च्या ‘बार्बेक्यु’ तयारीला लागा!

धन्यवाद,

- नितीन जोशी (अध्यक्ष बृहन्महाराष्ट्र मंडळ, उत्तर अमेरिका)