Feb, 2016

अध्यक्षीय

कविवर्य मंगेश पाडगांवकरांच्या निधनाने जीवनाकडे साक्षेपी वृत्तीने बघणारा, जगण्यातल्या सगळ्या जाणिवा आणि नेणिवांची उकल आपल्या समर्थ शब्दांनी करणारा आणि सर्वार्थाने मराठी भाषेवर निस्सिम प्रेम करणारा एक कलंदर कलावंत हरपला. पाडगांवकरांच्या शब्दांनी आपल्यावर मोहिनी घातली, जगण्याचा अर्थ सांगितला आणि आपले आयुष्य समृध्द केले. त्यांच्या आत्म्याला विनम्र श्रद्धांजली. त्यांच्या असंख्य कविता आठवताना सहजच विचार आला की ही अनुभूती आपल्या पुढच्या पिढीला मिळेल का? दूरदेशी आलेले आपण सर्वजण आपला धर्म, आपली संस्कृती, आपली भाषा ह्यांचे जतन करून आपले मूळ अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करतो. हाच वारसा पुढे चालवणे हेही अत्यंत गरजेचे आहे. सुदैवाने उत्तर अमेरिकेत संपूर्ण व्यक्तिस्वातंत्र्याचे वातावरण निदान ह्या बाबतीत तरी आहे. इथे जन्मलेल्या आणि वाढलेल्या आपल्या मुलांना जर त्यांच्या अस्तित्वाची (Identity) खरी ओळख पटवून द्यायची असेल, तर सर्वप्रथम त्यांना मराठी भाषा शिकविणे हे अत्यावश्यक आहे असं माझं प्रांजळ मत आहे. मराठी भाषेच्या माध्यमातूनच आपला धर्म आणि संस्कृतीची खरी ओळख पटू शकते. अशाच काहीशा विचारांनी प्रेरित होऊन काही गावांमधे मराठी शाळांचा उगम झाला. कुणाच्यातरी घरी किंवा देवळांमधे सुरू झालेल्या ह्या शाळांना एक शाश्वत आणि अधिकृत स्वरूप प्राप्त व्हावं आणि त्यांच्या संख्येत वाढ व्हावी ह्या उद्देशाने बृहन्महाराष्ट्र मंडळाने 2007 साली हा “मराठी शाळा” प्रकल्प हाती घेण्याचं ठरवलं. सुनंदा टुमणे, विजया बापट आणि अस्मिता जोशी ह्यांच्या कार्यकारी समितीकडे हे कार्य सोपवण्यात आलं. ह्या त्रयीने अतिशय परिश्रमपूर्वक आणि योजनाबध्द रीतीने हे कार्य मूर्त स्वरूपात आणलं. मंडळाच्या पुरस्कृत शाळांमधे समान आणि मान्यताप्राप्त अभ्यासक्रम असणे आवश्यक आहे हा महत्त्वाचा विचार पुढे आला. आणि “भारती विद्यापीठ, पुणे” ह्या मान्यवर शिक्षणसंस्थेशी संपर्क साधून त्यांचा अभ्यासक्रम सर्व शाळांमधे वापरण्याचा करार झाला. ह्या कामात टोरांटोच्या लीना देवधरे ह्यांनी पुढाकार घेतला आणि मोलाची कामगिरी केली.

सांगायला अतिशय अभिमान वाटतो, की उत्तर अमेरिकेत आज गावोगावी पस्तीसहून अधिक केंद्रांमध्ये मराठी शाळा भरते आणि सुमारे 1,500 हून अधिक विद्यार्थी त्यात मराठी भाषा आणि संस्कृतीचं शास्त्रशुध्द शिक्षण घेत आहेत. मंडळाचा अध्यक्ष

ह्या नात्याने शाळांच्या सामुहिक कार्याकडे जवळून पाहण्याची संधी मला मिळते. त्या अनुभवावरून मनापासून सांगतो, की शाळेच्या प्रमुख सल्लागार सुनंदा टुमणे, बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या सचिव सोना भिडे, कार्यकारी मंडळ सदस्य अजय हौदे, सर्व शाळांचे संचालक/संचालिका आणि शिक्षक/शिक्षिका ह्या सर्वांचे परिश्रम आणि विशेषकरून त्यांची मानसिक बांधिलकी, कळकळ आणि सेवाभावी वृत्ती पाहून मी खरोखर थक्क होतो. आपल्या मुलामुलींनी मराठी शिकावे म्हणून त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना उद्युक्त करणारे आणि त्यासाठी लागणारी सर्व मदत करणारे पालकसुध्दा विशेष अभिनंदनास पात्र आहेत. गावोगावीची महाराष्ट्र मंडळे शाळांना सर्वतोपरी मदत करत असतात. मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांना मंडळाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात अनेक ठिकाणी कलादर्शनाची विशेष संधी मिळते. संपूर्णपणे केवळ स्वयंसेवकांच्या परिश्रमांवर आणि पालक-शिक्षक ह्यांच्या सहकार्यावर अत्यंत सुरळीतपणे कार्यवाही करणारा हा प्रकल्प निश्चितच अभिमानास्पद आहे! महाराष्ट्रात मराठी भाषेची अवस्था हालाखीची होत चालली आहे असं अनेकांचं मत असल्याचं ऐकू येतं. पण उत्तर अमेरिकेतल्या मराठी शाळा मात्र आपली माय-मराठी वृध्दिंगत करण्यासाठी सर्वतोपरी सिध्द आहेत, आणि इथे मराठीचं भवितव्य उज्ज्वल आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही!

धन्यवाद,

- नितीन जोशी (अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ, उत्तर अमेरिका)