Dec, 2015

नमस्कार मंडळी,

दीडशेहून अधिक उत्सुक चेहऱ्यांनी भरलेलं सभागृह, एखाद्या उत्सवात असावं असं उत्साही वातावरण, आणि संपूर्ण कार्यक्रमात सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! हे आहे ३१ ऑक्टोबर रोजी डेट्रॉइटला भरलेल्या बी.एम.एम.२०१७च्या अधिवेशनाच्या तयारीसाठी जमलेल्या स्वयंसेवकांच्या सभेचं थोडक्यात वर्णन. अधिवेशनाच्या संयोजकांनी मला त्यात सहभागी होण्याची संधी दिली, आणि डेट्रॉइटला अधिवेशन म्हणजे “आपली मुलगी सुस्थळी पडली आहे!” अशीच जाणीव सभेच्या अखेरीस मला झाली! सुमारे दोन तास मी सर्वांशी संवाद साधला, त्यात प्रश्नोत्तरांचाही सहभाग होता. अधिवेशनाच्या प्रयोजनापासून ते कार्यवाहीपर्यंत चौफेर प्रश्न आणि त्याला मी आणि अधिवेशनाच्या प्रमुख संयोजिका अंजली अंतुरकर ह्यांची उत्तरं असा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेला हा कार्यक्रम होता. अधिवेशनाचे इतर कार्यवाह, किरण इंगळे, सतीश डोंगरे, हेमा राचमाले, नितीन अंतुरकर, हर्षद अण्णिगेरी, जयदीप बंगाळ, धनंजय देशमुख, अंजली वळे आणि राजेश ओक ह्या सर्वांनी अतिशय मौलिक माहिती स्वयंसेवकांना दिली. अनेक तरुण मंडळींनी “मला अधिवेशनात सक्रीय सहभाग का घ्यावासा वाटतो?” ह्या विषयावर केलेलं भाष्य खरोखर कौतुकास्पद होतं. आपण ही अधिवेशने का भरवतो, ह्या अनेकांच्या अव्यक्त पण मूलभूत प्रश्नाला त्यातून अत्यंत समर्पक उत्तर मिळालं आहे असं मला वाटलं. थोडक्यात काय, तर सर्व लहानथोर डेट्रॉइटकर ह्या कार्याला सर्वतोपरी सिध्द आहेत अशी माझी खात्री झाली. अर्थात, अधिवेशन निर्विघ्नपणे संपन्न होण्यासाठी ह्यापुढे अनेक आव्हानांना आपल्याला सामोरं जायचं आहे, ह्याची जाणीव देखील कार्यकर्त्यांना करून द्यावीशी वाटते.

ह्याच बाबतीत एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते, की हे “आपलं” अधिवेशन आहे हे सर्व उपस्थितांना वाटायला हवं, आणि त्या दृष्टिकोनाने विचार करता आपल्या सूचना, सुधारणा निश्चित पाठवा. त्यांचा योग्य तो उपयोग आम्ही करून घेऊ. मध्यंतरी कॅलिफोर्नियाचे श्री. प्रभाकर साठे ह्यांनी मला पत्र पाठवून आपले विचार प्रांजळपणे आणि आत्मीयतेने मांडले.

त्यांच्या काही सूचनांची अंमलबजावणी करण्यासंबंधी मी प्रमुख संयोजिका सौ. अंजली अंतुरकर ह्यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे. तसेच कॅनडाहून श्री. गुरुदत्त जोशी ह्यांनी त्यांचे गेल्या अधिवेशनातले बरेवाईट अनुभव मला सांगितले, आणि काही मौलिक सूचना केल्या. ह्या दोन्ही व्यक्तींचे आभार.

आपण सर्वांनी आनंदानी आणि उत्साहानी दिवाळी साजरी केली असेलच, आणि पाठोपाठ अमेरिकेत Thanksgivingची मेजवानी. सर्व कुटुंबानी एकत्र येऊन साजरा करायचा सण म्हणून त्याचं महत्त्व अनेकांसाठी खास असतं. पण एका वेगळ्या दृष्टिकोनातून आपण जर ह्या दिवसाकडे पाहिलं, तर आपण तो “कृतज्ञता दिवस” म्हणून मनोमन साजरा करू शकतो. प्रत्येकाच्या आयुष्यात अश्या अनेक व्यक्ती असतात, की ज्यांच्या संस्कारामुळे, मदतीमुळे, सल्ल्यामुळे आपण यशस्वी झालेलो असतो. आपण त्यांचे कायम ऋणी असतोच, पण ‘थँक्‌स्‌गिव्हिंग’च्या दिवशी आपण ते त्यांच्यापाशी व्यक्त करणे शक्य असेल, तर अथवा मनोमनी तरी करूया. एका आगळ्या आनंदाची देवाणघेवाण होईल हे निश्चित!

सर्वांना आगामी क्रिसमस सण/सुट्टीनिमित्त शुभेच्छा. बराय तर मंडळी, आता भेटूया नवीन वर्षात!

धन्यवाद,

- नितीन जोशी
अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ, उत्तर अमेरिका