Nov, 2015

नमस्कार मंडळी,
श्रीगणेशोत्सव आणि कोजागरीचे कार्यक्रम संपतात न संपतात, तोच सगळ्यांना दीपावलीचे वेध लागले असतील. सर्वच मंडळांमध्ये दिवाळी मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. बहुतेक मंडळांमध्ये विद्यमान कार्यकारिणीचा हा वर्षातला शेवटचा कार्यक्रम असल्यामुळे तो जास्तीत जास्त यशस्वी करण्यासाठी मंडळी अविरत परिश्रम करतात. “ह्याचसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिवस गोड व्हावा!” ही भावना सगळ्यांच्याच मनात असते. पुढच्या वर्षीच्या कार्यकारिणीत काम करायला उत्साहाने पुढे झालेले कार्यकर्ते आपापले मनसुबे रचत असतात. एकूणच आनंदाचे आणि उल्हासाचे वातावरण सर्व मंडळांमध्ये भरून राहिलेले असते. दीपावलीच्या ह्या मंगल प्रसंगी, बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या कार्यकारिणीच्या आणि विश्वस्तांच्या वतीने आपल्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा! तुम्हा सर्वांना आपापल्या इच्छेप्रमाणे संपत्ती, संतती आणि ह्या दोन्ही उदंड असतील तर किमान मन:शांती लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना!
सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये मी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (MTDC) आमंत्रणावरून त्यांनी आयोजलेल्या अधिवेशनासाठी (Maharashtra International Travel Mart) मुंबईला गेलो होतो. त्या दरम्यान माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे आणि उद्योगमंत्री श्री. सुभाष देसाई ह्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. अशा सदिच्छा-भेटींमुळे साहचर्याच्या गाठी दृढ होण्यास नक्कीच मदत होते. मा. मुख्यमंत्र्यांनी आपल्या अधिवेशनात घोषणा केल्याप्रमाणे अमेरिकेत ‘महाराष्ट्र परिचय केंद्र’ सुरू करण्यासंबंधी त्यांच्या सचिवांशी संवाद सुरू झाला आहे. माननीय शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे ह्यांनी बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या ‘मराठी शाळा’ प्रकल्पाचे मन:पूर्वक अभिनंदन केले, आणि सर्व प्रकारच्या मदतीची तयारी दर्शवली आहे.
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आपण सुरू केलेल्या निधीसंकलन उपक्रमाला काही मंडळांमधून भरघोस प्रतिसाद तरी कृपया आपल्या मंडळांचा मनोदय आम्हाला जरूर कळवा. सर्व निधी संकलित झाल्यावर महाराष्ट्र फाउंडेशनद्वारा तो “नाम” आणि “Save the Widow” ह्या उपक्रमांना पोहोचवला जाईल.
नववर्षात आपल्या सर्वांसाठी भारतातून काही उत्तम कार्यक्रमांचा दौरा आयोजित करण्याचा मानस आहे. लॉस एंजलीस येथील बृ. म. मं. २०१५च्या अधिवेशनात गाजलेला ‘गंधर्व’ हा श्री. आनंद भाटे, श्री. आदित्य ओक आणि श्री. प्रसाद पाध्ये ह्यांनी सादर केलेला कार्यक्रम आगामी गुढीपाडव्याचा सुमारास निश्चित होण्याच्या मार्गावर आहे. विशेष आकर्षण म्हणजे दौऱ्यातल्या काही कार्यक्रमांना पडद्यावरचे बालगंधर्व, सुप्रसिध्द अभिनेते श्री. सुबोध भावे उपस्थित राहणार आहेत. इतरही काही कार्यक्रमांविषयी लवकरच आपल्याला माहिती देणार आहोत.
पुनश्च एकवार आपल्या सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
- नितीन जोशी

अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ, उत्तर अमेरिका