July, 2015

नमस्कार मंडळी,

जिद्द व परिश्रमाचे पंख असतील तर आकाशाला गवसणी घालणं अवघड नसतं, असं म्हंटलं जातं. ते सिध्द करून दाखवलंय आमच्या सर्व ‘एले’ च्या मित्रांनी. शेवटपर्यंत आव्हानांना शेवट नव्हता, पण एकत्र राहून सर्व शिलेदार आव्हानांना सामोरे गेले व त्यावर मात करत बृहन्महाराष्ट्र मंडळाचे (बृ. म. मं.) १७ वे अधिवेशन अनेक व्यक्तींच्या सान्निध्यात मोठ्या दिमाखाने यशस्वी करून दाखवले. सर्व स्वयंसेवकांच्या परिश्रमांशिवाय हे शिवधनुष्य पेलणे शक्य नव्हते हे सगळ्यांना माहीत आहेच, पण माझ्या मनात खरे नायक आणि नायिका आहेत ते सर्व शिलेदारांचे कुटुंब. ह्या सर्व कुटुंबांनी आपल्या घरचे कार्य समजून, मानसन्मानाची अपेक्षा न करता, त्यांच्या घरातील बृ. म. मंडळाच्या स्वयंसेवकांना पूर्णपणे पाठिंबा दिला, आणि हाती आलेले काम पूर्ण करून या अधिवेशनाच्या यशाचे भागीदार झाले.

बृ. म. मंडळाच्या १९८४पासून झालेल्या प्रत्येक अधिवेशनामधे काही गोष्टी चुकल्या, आणि काही इतर अधिवेशनांच्या तुलनेत चांगल्या झाल्या. चुकांतून शिकलो आणि यशस्वी गोष्टींना स्वीकारत गेलो. २०१५च्या अधिवेशनाची गोळाबेरीज २०१७ मधे डेट्रॉईटमधे होणाऱ्या, अधिवेशनात नक्कीच वापरण्यात येईल. डेट्रॉईट येथील आगामी अधिवेशनाच्या मुख्य संयोजिका सौ. अंजली अंतुरकर व डेट्रॉईट मराठी मंडळामधील सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन, आणि खूप खूप शुभेच्छा!

‘गरम शेगडीवरील निखाऱ्यावर एक मिनिट हात ठेवल्यास, तो वेळ एक तासासारखा वाटतो, मात्र सुंदर मुलीच्या सहवासात एक तास एका मिनिटासारखा वाटतो, यालाच काल-सापेक्षता म्हणतात’, हा अल्बर्ट आईन्स्टाईनचा किस्सा आपल्याला माहीत आहेच. मला वाटते, आवडीच्या कामाचेही असेच असते! बृहन्महाराष्ट्र मंडळाचे हे कार्य आम्ही दोन वर्षापूर्वी हाती घेतले, पण आत्ता कुठे काल/परवा हाती घेतले होते की काय, असे वाटते. मला समाधान आहे, की आमच्या समितीने ज्या गोष्टी ठरवल्या होत्या, त्या बहुतेक सर्व गोष्टींची पूर्तता करण्यात आम्हांला यश आले. बृ. म. मंडळाची कार्यकारिणी, विश्वस्त, बृहन्महाराष्ट्र वृत्ताचे संपादक मंड्ळ, वेगवेगळ्या महाराष्ट्र मंडळांचे अध्यक्ष, मराठी शाळेचे समन्वयक व शिक्षक, अनेक हितचिंतक या सर्वांनी अनेक प्रकल्पावर एकजुटीने काम केले. हे काम करत असताना आम्ही आयुष्यभराची नातीही जोडली, या गोष्टीचाही मला विशेष आनंद होतो आहे.

गेली दोन वर्षें आम्ही ही मराठीची विजयपताका मोठ्या आनंदाने फडकवत होतो, तो विजयध्वज पुढेही फडकवत ठेवण्यासाठी नवीन अध्यक्ष शिकागोचे नितीन जोशी, यांच्या नेतृत्वाखाली नवीन कार्यकारिणीची निवड झाली आहे. त्यामधे आमच्या सध्याच्या कार्यकारिणीतील तिघेजण पुढच्या कार्यकारिणीतही कार्यरत राहणार आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. जसा आम्हाला लोभ व आपले सहकार्य मिळाले, तसा त्यांनाही मिळेल ह्याबद्दल मला शंका नाही. पुढील कार्यकारिणीला मन:पूर्वक शुभेच्छा.

जाताजाता बृ. वृत्ताचे संपादक विनता कुलकर्णी, ज्यांनी माझे विचार चांगल्या शब्दात मांडायला नेहमीच मदत केली, तसेच वृत्ताचे सह-संपादक वैभव पुराणिक व मोहन रानडे यांचे वैयक्तिक आभार मानतो,
बृहन्महाराष्ट्राच्या छताखाली उत्तर अमेरिकेतील तमाम मराठी माणूस एकजुटीने एकवटला आहे, एकजुटीची भक्कम वज्रमूठ आवळून ठेवायला हवी. मंडळाची प्रगती व्हायला हवी, या पुढेही अनेक वर्षे अधिवेशने व्हायला हवीत, महोत्सव साजरे व्हायला हवेत. पण त्यासाठी मराठी लोकांमध्ये संवाद वाढायला हवेत, संबध दृढ होऊन मराठी माणसाची उत्तरोत्तर प्रगती व्हायला हवी, चला तर मग,

ध्वज भाषेचा उंच धरा रे, हाती मिळवून हात चला रे!

जय मराठी जय महाराष्ट्र, एकमुखाने ललकारा रे !

जय हिंद, जय महाराष्ट्र, जय अमेरिका!!

- सुनील सूर्यवंशी (अध्यक्ष, २०१३-२०१५, बृहन्महाराष्ट्र मंडळ)