Aug, 2015

नमस्कार मंडळी,

सर्वप्रथम मला आणि माझ्या सहकाऱ्यांना बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या (बृ. म. मं.) कार्यकारिणीवर येण्याची संधी दिल्याबद्दल मन:पूर्वक आभार! शिकागो ही बृहन्महाराष्ट्र मंडळाची जन्मभूमी आहे, त्यामुळे १९८५ साली इथे आल्यापासूनच माझा मंडळाच्या कार्याशी परिचय झाला. श्री. शंकरराव हुपरीकर ह्यांच्या नाटकात अभिनयाची संधी मिळाली, आणि त्या निमित्ताने मंडळाचे संस्थापक कै. विष्णू वैद्य, कै. शरद गोडबोले आणि सौ. जयाताई हुपरीकर ह्यांचा सहवास लाभला. “मराठी तितुका मेळवावा” ही वरवर सोपी वाटणारी परंतु उत्तर अमेरिकेतल्या मराठी लोकांच्या दृष्टीने विचार करता अत्यंत दूरगामी असणारी मूळ संकल्पना घेऊन ह्या त्रयीने सुरू केलेल्या उपक्रमाचे आज एका विशाल प्रकल्पात रूपांतर झाले आहे.
मंडळाशी माझं नातं जास्त जवळचं झालं, ते शिकागो येथील बृ. म. मंडळाच्या १५व्या अधिवेशनापासून! अधिवेशनाचा प्रमुख संयोजक म्हणून कार्य करत असताना प्रशासनाचा अनुभव तर मिळालाच, परंतु वर्षानुवर्षे ह्या संस्थेसाठी अत्यंत आपुलकीने आणि कळकळीने काम करणाऱ्या अनेक लोकांच्या संपर्कात मी आलो. आणि जाणीव झाली की आपल्या मराठी समाजासाठी, त्याच्या वाढत्या आणि बदलत्या गरजांचा विचार करता, हे कार्य चिरंतन स्वरूपाचं असणं अत्यंत आवश्यक आहे. ह्याच विचाराने बृ. म. मंडळात २०१३-२०१५ च्या कार्यकारिणीचा सदस्य म्हणून मी काम केले. अनेक सहकाऱ्यांचा पाठिंबा, मित्रांच्या सदिच्छा आणि उत्तर अमेरिकेतील बहुतांशी मराठी मंडळांच्या प्रतिनिधींनी माझ्यावर आणि नवीन कार्यकारिणीतील माझ्या सर्व सदस्यांवर दाखवलेल्या विश्वासाचे फळ म्हणून आम्हाला २०१५-२०१७ च्या बृ. म. मंडळ कार्यकारिणीवर कामाची संधी मिळत आहे. उत्तर अमेरिकेतल्या सर्व विभागांचं प्रतिनिधित्व करणारी, अनुभव आणि उत्साहाचं उत्तम मिश्रण असलेली आमची कार्यकारिणी आहे. कार्यकारिणीचा अधिक परिचय या अंकात पुढील पानांवर आहेच. आम्हाला जरी सर्व महाराष्ट्र मंडळांचे नेतृत्व करायचे असले, तरी आपले सर्वांचे विचार, सूचना आणि मार्गदर्शन ह्यांची आम्हाला गरज आहे. कारण माझी अशी दृढ भावना आहे.

होईल तोच नेता, अवघ्या यशाचा धनी |
कार्यास स्फूर्ती ज्याच्या, जनमनाचे प्रतिध्वनी ||

लॉस एंजलीस अधिवेशनाहून परतल्यावर लगेच डेट्रॉइट येथे २०१७ मधे होणाऱ्या अधिवेशनाच्या पूर्वतयारीला सुरुवात झाली. त्याच संदर्भात २०१५ च्या लॉस एंजलीस येथील बृ. म. मंडळ अधिवेशनाचे प्रमुख प्रायोजक - ‘एक्सलन्स शेल्टर ग्रूप’चे डॉ. नरेश भरडे आणि त्यांच्या बरोबर आलेले अभिनेते श्री. अतुल कुलकर्णी ह्यांची शिकागोमध्ये भेट झाली.
‘एक्सलन्स शेल्टर ग्रूप’ला मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे उत्साहित झालेले डॉ भरडे ह्यांनी डेट्रॉइटमधील आगामी अधिवेशनाचे प्रायोजकत्व स्वीकारण्याची इच्छा प्रदर्शित केली. डेट्रॉइटचे कार्यकर्ते ह्यासंबंधी त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहेतच, पण शुभारंभालाच अशी चांगली घटना घडल्यामुळे डेट्रॉइटकरांचा उत्साह नक्कीच द्विगुणित झाला आहे. बराय तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढच्या महिन्यात.
आपला नम्र
- नितीन जोशी (अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ, उत्तर अमेरिका)