June, 2015

अध्यक्षीय
नमस्कार मंडळी,
जसा एक-एक दिवस जातो आहे, त्याचबरोबर आमचा आनंद, आमची उत्कंठा आणि आतुरताही वाढते आहे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या (बृ. म. मं.) अधिवेशनासाठी आम्ही सज्ज झालो आहोत. आपणही सज्ज आहात ना? लहानथोर, सगळ्यांना आपलंसं करणारा हा अनुभव आपण परिवारासमवेत घ्यावा असा आहे. मनुष्य-स्वभाव असा आहे, की प्रत्येक घटनेतून मी काय घेऊन जाईन, हा विचार करतो. मला वाटते, तुम्ही अधिवेशनाला आल्याशिवाय तुम्ही इथून काय घेऊन जाल, हे तुम्हास समजणे कठीण आहे.
मनोरंजनाबरोबरच बुध्दीरंजन कसे होईल, ह्याचीही या अधिवेशनात विशेष दखल घेतली आहे. उत्तर अमेरिकेतील मराठी समाजाच्या गरजा लक्षात घेऊन माहिती देणारी आणि विचार करायला लावणारी सत्रेही या अधिवेशनात आपल्याला अनुभवायला मिळतील. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यशाळा, मानसिक आरोग्यावर ‘आपले आरोग्य आपल्या मनात’, ‘Make death your friend’, ‘Alcohol Addiction’, तसेच आयुष्यातील कठीण प्रसंगी मार्गदर्शन करणारा ‘आता पुढे काय’ असे अनेक विविधरंगी कार्यक्रम आपल्याला पहायला मिळतील.
१५ मे २०१५ ह्या दिवशी बृ. म. मंडळाच्या अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा निकाल लागला. बृ. म. मंडळाचे २०१७चे अधिवेशन आयोजन करण्यासाठी डेट्रॉइटच्या मंडळाची निवड झाली आहे. बृ. म. मंडळ स्कॉलरशिपसाठी निवड झालेल्या युवांची, आणि बृ. म. मंडळाच्या विविध पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर झाली आहेत. या सर्वांचे अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा! ह्या सर्व निवडसमितींवर जे स्वयंसेवक होते, त्यांनी "सिलेक्टिंग बेस्ट फ्रॉम बेस्ट" अशी अतिशय अवघड कामगिरी उत्तमपणे पूर्ण केली. त्या सर्व स्वयंसेवकांचे मनापासून आभार.
पुरस्कारांसाठी उत्तर अमेरिकेतील विविध क्षेत्रांतील एकंदर ७७ गुणी व्यक्तींची नामांकनपत्रे आली होती. त्यामधे तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधनाबद्दल ३००+पेटंट मिळवलेले, फार्माकॉलॉजी विषयातील संशोधनाबद्दल ९०+ पेटंट मिळवलेले, ४०+वर्षे समाजकार्य केलेले, इतिहासात सर्वात तरुण वयात २० दशलक्ष डॉलर्स गुंतवणूक उभा करणारा उद्योजक, १००+मजली विविध इमारतींची रचना करणारे आर्किटेक्ट, एक समर्पित आणि सर्जनशील असे मराठी शाळाशिक्षक, $100 दशलक्ष व्यावसायिक गुंतवणूक करणारे आणि शिवाय यशस्वी लेखक अशी प्रतिभावान व्यक्ती, ऑस्कर पुरस्काराच्या कार्यक्रमातील ५० व्यक्तींसाठी ड्रेसेस बनवणारे फॅशन डिझायनर, तसेच उत्तर अमेरिकेतील मराठी समुदायास एकत्रित आणण्यासाठी बृ. म. मंडळाची स्थापना करून मराठीजनांसाठी मह्त्त्वपूर्ण कार्य करणारे, असे विविध लोक या पुरस्कार- विजेत्यांच्या यादीत आहेत. त्या सर्वांचे अभिनंदन. पुरस्कार- विजेत्यांची कामगिरी आपणां सर्वांना अभिमानास्पद आहे. त्यांच्याबद्दल अधिक माहिती या अंकात आहेच.
अधिवेशनाची नावनोंदणी करण्यासाठी काही मोक्याचा जागा अजूनही शिल्लक आहेत, तर आता जास्त उशीर न करता, नावनोंदणी करा व लवकरात लवकर LAला चला!
जवळपास गेली दोन वर्षे मी बृ. वृत्ताच्या निमित्ताने तुमच्याशी संवाद साधत असताना मनापासून आनंद होत असे. तुम्हाला भेटायला मी फार उत्सुक आहे. जर तुम्हाला माझे विचार आवडले असतील, तर दोन मिनिटे का होईना जरून भेटा.
लवकरच भेटूयात, ह्यावेळेस मात्र प्रत्यक्ष भेटूयात!

सुनील सूर्यवंशी (अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ )
suryawanshi@yahoo.com