May, 2015

अध्यक्षीय

नमस्कार मंडळी,

मुंबईचे माजी मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी, ‘पाच हजार वर्षे मुंबई महाराष्ट्राला देणार नाही’ अशी वल्गना केली होती, तेव्हा मराठी व महाराष्ट्रावर प्रेम करणारे मराठीजन एकत्र आले व जोरदार लढा दिला. त्यात १०६ हुतात्म्यांना आपले रक्त सांडावे लागले, आणि दिनांक १ मे, १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला. त्यामुळे ह्या दिवसांस मोठे महत्त्व आहे. सर्व मराठीजनांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!
बृहन्महाराष्ट्र मंडळ (बृ. म. मं. / BMM) पुरस्कारांसाठी ‘पाहिजे तसा अजून प्रतिसाद मिळाला नाही’, असे मी एप्रिलमधील वृतात लिहिले होते, परंतु शेवटच्या आठवड्यात भरघोस प्रतिसाद मिळाला असून त्यासाठी सुमारे ७७ नावे आली आहेत. आता पुरस्कार निवडीचे काम जोरात चालू आहे. त्याचा निकाल आम्ही लवकरच कळवू.
बृ. म. मंडळाने पहिल्यांदाच हाती घेतलेल्या स्कॉलरशिप प्रकल्पाला अर्ज पाठविण्यास १० मे पर्यंत वेळ आहे. त्याबद्दल अधिक माहिती या अंकात पान २ वर आहेच. हायस्कूलमधून कॉलेजला जाणाऱ्या आपल्या माहितीतील, मराठीकुटुंबातील विद्यार्थ्यांना याबद्दल जरूर कळवावे.
‘अग्रणी’, ‘विरंगुळा’, ‘क्लब ५५+’ हे अमेरिकेतील काही राज्यात असलेले उत्तररंगचे क्लब. असाच एक क्लब कनेटिकटमधे सुरू करण्यात आला. कनेटिकटमधील उत्तररंग क्लबचे उद्घाटन डॉ. मोहन आगाशे ह्यांचे हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी बृ. म. मंडळाच्या उत्तररंग प्रकल्पाचे कौतुक केले व ही काळाची गरज आहे असेही नमूद केले. कनेटिकट महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष मंगेश करंदीकर व कार्यकारिणी यांनी "अस्तु" ह्या चित्रपटाचेही आयोजन केले होते.
लॉस एंजलीस येथे जुलै २ ते ५ आयोजित बृ. म. मंडळाच्या आगामी अधिवेशनाबद्दल अधिक माहिती या वृत्तात पान ३ वर आहेच, परंतु सांगायला अतिशय आनंद होतो आहे, की अधिवेशनाचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि विशेष पाहुणे म्हणून श्री. विवेक रणदिवे यांनी आमंत्रण स्वीकारले आहे.
१५ मे नंतर अधिवेशनाचे नोंदणीदर वाढणार आहेत. तेव्हा त्याअगोदर, अधिवेशनाच्या संकेतस्थळावर जाऊन लवकरात लवकर नोंदणी करावी.

लवकरच बोलूयात व लॉस एंजलीस येथे भेटूयात.

सुनील सूर्यवंशी (अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ )
suryawanshi@yahoo.com