Apr, 2015

नमस्कार मंडळी,

गेल्या आठवड्यात माझ्या मुलाच्या शाळेत, ‘Diversity Day’ साजरा झाला. अपंगत्व असणाऱ्या लोकांच्या गरजांबद्दल प्रभावीपणे मुलांच्या मनात सकारात्मक दृष्टिकोन, स्वीकृती आणि सहानुभूती विकसित करण्यासाठी ह्या दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. प्रात्यक्षिके, देखावे, त्याद्वारे प्रत्यक्ष अनुभवांतून मुलांना विशिष्ट गरजा असणाऱ्या व्यक्तींच्या जीवनशैलीबद्दल माहिती आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची जाणीव झाली. न दिसणारा चष्मा घालून मुलांना चालण्याचा अनुभव दिला. मुलांना विशिष्ट सांकेतिक भाषा (sign language) व चेहऱ्यावरील भाव ओळखून संवाद करायला सांगितले, व्हील चेअर व स्कींग ग्लोव्ह्‌ज्‌ घालून साधी कामे करायला सांगितली. ते करताना येणाऱ्या अडचणी मुलांच्या लक्षात आल्या. मी शिक्षिकेशी बोलत होतो, त्या म्हणाल्या- ‘एक योग्य वृत्ती विकसित करणे महत्त्वाचे आहे’ अती-सहानुभूती किवा अती-अज्ञानही नको.

सांगायला आनंद होतो आहे की, बृहन्महाराष्ट्र मंडळ (बृ. म. मं.) अधिवेशनात, आम्ही देखील ‘सेतू बांधूया’ नावाचा आगळा वेगळा सामाजिक बांधिलकीचा कार्यक्रम सादर करीत आहोत. विविध सामाजिक संघटनेचे प्रमुख (एकल, प्रथम, महाराष्ट्र सेवा समिती, महाराष्ट्र फाऊंडेशन, इत्यादी), आणि त्यांचे लाभार्थी यांना एका मंचावर आणण्याचा विचार आहे. त्यांच्याद्वारे उपस्थितांमधे विचारांचे आदान-प्रदान आणि वेगवेगळ्या संस्थांबद्दल माहिती होणार आहे.

बृ. म. मं. पुरस्कारांसाठी अजून पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. पुरस्काराने सन्मानित करण्यायोग्य कार्य असलेल्या व्यक्तींची माहिती जरूर कळवावी. बृ. म. मं. २०१७ च्या अधिवेशनाच्या संयोजकत्वासाठी निवडीचे काम चालू आहे, तीन मंडळांकडून चांगले प्रस्ताव आले आहेत. त्याची निवड- प्रक्रिया लवकरच पूर्ण करून पुढच्या महिन्यात निकाल जाहीर करू.

मराठी शाळेविषयी एक आनंदाची बातमी, अटलांटामधे मराठी शाळेला तेथील जिल्हा पातळीवर मान्यता प्राप्त झाली आहे. त्याद्वारे मुलांना शैक्षणिक सत्रामधे मराठी भाषा शिकण्याचे श्रेय/क्रेडिट मिळणार आहे. पुढील काही वर्षात अमेरिकेत इतरही गावांमधे मराठी भाषेला अशी मान्यता मिळाल्यास नवल वाटणार नाही.

प्रायोजक आपल्या अधिवेशनात पैसा खर्च करण्यासाठी इच्छुक आहेत, पण त्याच वेळी, त्यांनादेखील त्यांच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळावा ही अपेक्षा असते, आणि आम्हीही त्यासाठी प्रयत्नशील आहोत. मला सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे, की अधिवेशनाचे 'प्लॅटिनम' प्रायोजक 'एक्सलन्स शेल्टर’चे अध्यक्ष डॉ. भारदे आणि त्यांचे सहकारी सुशांत सिन्हा ह्यांनी बृ. म. मंडळाच्या मदतीने, अमेरिकेत आठ मराठी मंडळांमधे आपल्या व्यावसायिक सेवेबद्दल लोकांना माहिती दिली.

बृ. म. मंडळाच्या आगामी अधिवेशनासाठी नोंदणी अजूनही खुली आहे. तेव्हा आपण अजून नोंदणी केली नसल्यास त्वरित करावी, आणि अधिवेशनाचा आनंद घ्यावा.

लवकरच बोलूयात.

सुनील सूर्यवंशी (अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ )
suryawanshi@yahoo.com