Dec, 2014

नमस्कार मंडळी,

महाराष्ट्रातील जनतेचे सरासरी वय सुमारे २७ वर्षे आहे, आणि ५५ टक्क्याहून अधिक जनतेचे सरासरी वय २५ वर्षांपेक्षा कमी आहे. हे आकडे बघता आजच्या तरुणांचे प्रश्न व आकांक्षा जो नेता समजू शकतो अशा नेत्याची महाराष्ट्राला गरज होती. ती गरज एक स्वत: तरुण व स्वच्छ प्रतिमेचे नेते म्हणून ओळख असलेले देवेंद्र फडणवीस ह्यांची मुख्यमंत्रीपदावर निवड झाल्याने पूर्ण झाली, असे सध्या तरी वाटते आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीची गंगा भरभरून वाहण्यासाठी खोळंबलेले निर्णय भराभर घेतले जावोत व महाराष्ट्राच्या जनतेसाठी योजिलेल्या सर्व चांगल्या कार्यासाठी नवे मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ ह्यांना बृहन्महाराष्ट्र मंडळ (बृ. म. मं.) परिवारातर्फे शुभेच्छा!
सामाजिक कार्यात आपल्या पिढीतील अनेक लोक महत्त्वाची भूमिका बजावत आहेत हे आपल्याला माहीत असेलच, पण आपली पुढील पिढीही ह्यात मागे नाही. पुढील पिढीतील अनेकजण पूर्णवेळ सामाजिकक्षेत्रात काम करतात. या तरुण तरुणींना भेटण्याचा योग मला अलिकडेच आला. महाराष्ट्र फा‌ऊडेंशनतर्फे आयोजित केलेल्या ‘Social Impact Redefined: How the next Generation is Driving Change’ या चर्चासत्राला मी उपस्थित होतो. त्यानिमित्ताने, डॉ. आदिती शारंगपाणी, शुमा पेंडसे, मनिषा भिंगे, मोना प्रकाश आणि मनिषा केळकर ह्यांच्या सामाजिक कार्याची मला ओळख झाली. निधीसंकलनासाठी असा उत्तम कार्यक्रम केल्याबद्दल महाराष्ट्र फा‌ऊडेंशनचे जितके कौतुक करावे तितके कमीच आहे.
राजकारणी लोक आपल्या अनुभवातूनच शिकतात, त्यांना त्यांच्या व्यवसायाचे प्रशिक्षण हवे असले तरी उपलब्ध नसते, अशी सर्वसाधारण समजूत असते. परंतु हा समज चुकीचा आहे, हे मला अलिकडेच कळले. रामभा‌ऊ म्हाळगी प्रबोधिनी ही संस्था निवडून आलेल्या प्रतिनिधींना नेतृत्व, निर्णय कसे घ्यावेत, लोकांशी सुसंवाद कसा साधावा ह्या गोष्टी शिकवते. आनंदाची गोष्ट म्हणजे मला ह्या संस्थेचे महासंचालक (डायरेक्टर जनरल) श्री. विनय सहस्रबुद्धे ह्यांना भेटण्याची संधी मिळाली. श्री सहस्रबुद्धे एक विचारवंत असून भारतीय जनता पक्षाचे ते राष्ट्रीय उपाध्यक्षही आहेत. त्यांच्या मुलाखतीत श्री सहस्रबुद्धे ह्यांची बुद्धिमत्ता आणि विचारातील स्पष्टता पाहून मी प्रभावित झालो आहे.
लोकसभेच्या प्रवक्त्या सौ. सुमित्रा महाजन ह्यांच्या सन्मानार्थ, दोन आठवपूंर्वी बृ. म. मंडळाने न्यूयॉर्कमधे एक अनौपचारिक कार्यक्रम आयोजित केला होता. त्याप्रसंगी सौ. महाजन ह्यांच्याशी सविस्तर बोलण्याची मला संधी मिळाली.
सौ. महाजन मध्यप्रदेशातील इदोंर येथे अनेक दशकांपासून रहात आहेत. हिंदी भाषाप्रांतात राहूनही त्या आपले मराठीचे मूळ विसरल्या नाहीत.,शिवाय महाराष्ट्रीय कला व संस्कृतीच्या समर्थक आहेत. त्यांनी आमच्यासाठी खास पुण्याहून आबांबर्फी आणली व ती आठवणीने आम्हाला दिली हे विशेष.
सौ. महाजन भारतीय संसदेच्या सर्वात वरिष्ठ खासदार आहेत, आणि इदोंर मतदार संघातून सलग आठ वेळा निवडून आलेल्या एकमेव महिला खासदार आहेत. पुढील अधिवेशनात भारतीय चित्रपटसृष्टीचे व हॉलीवूड चित्रपटसृष्टीचे व्यावसायिक एकत्र आणण्यासाठी बृ. म. मंडळ कार्यरत आहे ही कल्पना त्यांना आवडली व ती यशस्वी होण्यासाठी त्यांनी बृ. म. मंडळाला शुभेच्छा दिल्या.
२०१५मधे लॉस एजंलीस येथे आयोजित बृ. म. मंडळाच्या अधिवेशनाची समिती अधिवेशनाच्या कार्यक्रमासाठी कॉर्पोरेट प्रायोजक मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यासाठी अधिवेशनाच्या समितीचे काही सदस्य भारतात जाणार आहेत. मीही पुढच्या महिन्यात भारतात भेट देणार आहे, तेव्हा तेथील विशेष बातम्या कळवीनच.

कळावे लोभ असावा.
- सुनील सूर्यवंशी (अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ)
suryawanshi@yahoo.com