Nov, 2014

नमस्कार मंडळी,
"एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ" ह्या वचनाचे उत्तम उदाहरण म्हणजे बृहन्महाराष्ट्र मंडळ (बृ.म.मं.) परिवारातील प्रांतिक पातळीवर अनेक मंडळांनी एकत्र येउन केलेले दोन बृ.म.मं. (BMM) महोत्सव. दसरा, दिवाळी यासारख्या सणासुदीला जसे परिवारातील लोक एकत्र येतो, भेटतो, चांगला वेळ घालवतो, तसेच ही सर्व मंडळे एकत्र आली, एकमेकांशी ओळखी वाढवल्या, व संस्कृती टिकवण्याचे विधायक कार्य केले. जे मराठी बांधव काही कारणास्तव अधिवेशनाला जाऊ शकत नव्हते, त्यांच्यापर्यंत बृ.म.मंडळ या महोत्सवाच्या रूपाने पोहचले आहे व आपल्या ह्या सोहळ्यात सर्वांना सामावून घेतले आहे.
यंदाची ही दिवाळी कशी गेली, असं कुणी विचारलं तर काय सांगायचं? सांगायचं चांगली गेली. मस्त गेली. बृ.म.मंडळाच्या दृष्टीने मात्र खरच फार छान गेली, असे सांगायला मनापासून आनंद होत आहे. मी ओर्‌लँडो तसेच वॉशिंग्टन डीसी येथे बृ.म.मंडळ महोत्सवाच्या निमित्ताने भेट दिली. सर्व कार्यकर्ते, अध्यक्ष, मोठ्या गुण्यागोविंदाने काम करत होते ते बघून फार आनंद झाला. बृ.म.मंडळ महोत्सवाच्या या नव्या उपक्रमाने आमच्या कार्यकारिणीने एक मोठा पायंडा घातला, तो पुढेही असाच चालू राहील असा पूर्ण विश्वास आहे.
अलिकडेच "तरुण आहे रात्र अजुनी" गाणाऱ्या पद्मजा फेणाणी ह्यांचा दौरा बृ.म.मंडळाने आयोजित केला. त्यांचे कार्यक्रम जरी कमी मंडळात झाले, तरी जिथे झाले तिथल्या प्रत्येक मंडळाला एक चांगला कार्यक्रम बघण्याचा आनंद मिळाला, व कार्यक्रमाला उपस्थितांनी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
असे म्हटले जाते, नाणं खणखणीत असले तर जाहिरातीची गरज नसते, त्याचा प्रत्यय आम्हाला "प्रकाश आमटे द रीअल हिरो" ह्या चित्रपटाबद्दल आला, सर्व मंडळांना एक ईमेल पाठवली आणि आम्हाला भराभर २० मंडळकडून होकार आला. बृ.म. मंडळाने चित्रपटाच्या सादरीकरणाबरोबर दिग्दर्शक समृद्धी पोरे ह्यांच्या गप्पांचा कार्यक्रमही आयोजित केला आहे. ह्या चित्रपटाची कथा काल्पनिक वाटत असली तरी ती खरी आहे. नाना पाटेकर, सोनाली कुलकर्णी, मोहन आगाशे ह्यांच्यासारखे दिग्गज ह्या चित्रपटासाठी मिळाले आहेत, नेहमी वेगवेगळे विषय सहजपणे हाताळणाऱ्या समृद्धी पोरे ह्यांचे दिग्दर्शन लाभले आहे. प्रकाश आमटेंबद्दल वेगळे काही लिहायला नको, फेसबुकवर एक कविता आढळली ती मात्र येथे सांगायला नक्कीच आवडेल.

’जगणं खूपच सुंदर आहे, त्यावर हिरमुसू नका.
एक फुल उमललं नाही म्हणून रोपाला तुडवू नका.
सगळं मनासारखं होतं असं नाही, पण मनासारखं झालेलं विसरू नका.
सुटतो काही जणांचा हात नकळत,पण धरलेला हात सोडू नका!!

बृ.म.मंडळाच्या शाळेत मुले मराठी शिकत असताना भरपूर वेळ देत असतात, कष्ट घेत असतात. पालकांची पाल्यांनी आपली मातृभाषा शिकावी अशी एक भावनिक गरजही त्यामुळे भागवली जाते, मुलानांही आपण मराठी शिकल्याने पालकांना आनंद होतो हे पाहून बरे वाटते. ह्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेतच, परंतु ह्याशिवाय मुलांना प्रत्यक्ष आपल्या शालेय जीवनात काय फायदा करून घेता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत., सांगायला आनंद होतो की उत्तर अमेरिकेत बृ.म. मंडळाची ज्या गावात मराठी शाळा आहे तेथील सर्व शिक्षक व मंडळाचे पदाधिकारी मिळून मराठी भाषेला हायस्कूलमधे मान्यता मिळावी म्हणून प्रयत्नशील आहेत. या प्रयत्नांना यश येईल ह्याबद्दल मला शंका नाही.
लॉस एंजलीस येथील २०१५ मधील अधिवेशन जवळ येऊ लागले आहे. सर्व समितीवरील कार्यकर्त्यांवर कामाचा दबाव येऊ लागला आहे, व झपाट्याने कामे होऊ लागली आहेत. दोन तीन मोठे कार्यक्रम लवकरच निश्चित करून आपणां सर्वांना कळवू.

कळावे लोभ असावा,
- सुनील सूर्यवंशी (अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ )
suryawanshi@yahoo.com