Sept, 2014

acheter cialis नमस्कार मंडळी,
सर्व वृत्त वाचकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! ह्यावर्षी मंडळांनी गणेशोत्सवासाठी वेगळे काय केले, ह्याचे आम्ही अनौपचारिकरित्या सर्वेक्षण केले. त्यात प्रामुख्याने पुढील तीन गोष्टी जाणवल्या. जास्तीतजास्त मराठमोळ्या पध्दतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा मंडळांचा प्रयत्न होता. मग ते कार्यक्रम असो, पेहराव असो, जेवण असो, त्यात मराठीपण कसे जपता ये‌ईल, ह्यासाठी सर्वांचा प्रयत्न असतो. काही मंडळे अमराठी भारतीयांना आमंत्रित करून त्यांना आपल्या गणेशोत्सवात सामील करण्याचा प्रयत्न करतात. काही मंडळे जास्तीतजास्त मुलांना कार्यक्रमात कसे सामावून घेतले जा‌ईल, यासाठी प्रयत्न करत असतात. एकंदरीत मंडळांच्या सर्व सदस्यांना एकत्र आणून त्यांना मंडळाच्या कार्यात कसे सामावून घेतले जा‌ईल, हे बघितले जाते. सार्वजनिक कार्यक्रमातून समाज हा सशक्त आणि उत्साही होत असतो, हा लोकमान्य टिळकांचा सार्वजनिक गणेशोत्सवाचा हेतू सर्व मंडळे खर्‍या अर्थाने साध्य करीत आहेत.
फिलाडेल्फिया मंडळाच्या अध्यक्षा सौ. कोमल दाते, व फिलाडेल्फिया गणेशोत्सवाचे प्रमुख श्री मंदार जोगळेकर ह्यांनी मला दहा दिवसांच्या या उत्सवाच्या उद्घाटनास प्रमुख पाहुणे म्हणून बोलवल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार. फिलाडेल्फिया मंडळ व तेथील सर्व भारतीय सामाजिक संस्था मिळून मोठ्या उत्साहाने व जल्लोषात दहा दिवस गणेशोत्सव साजरा करतात, हे पाहून मंडळ कार्यकर्त्यांचा अभिमान वाटला.
आमच्या कार्यकारिणीने जेव्हा बृ. म. मंडळाचा कारभार हाती घेतला, तेव्हा प्रांतिक पातळीवर चार/पाच मंडळांनी एकत्र ये‌ऊन कार्यक्रम करावेत, एकमेकांशी ओळखी वाढवाव्यात, स्थानिक कलाकारांना मोठा रंगमंच द्यावा, हे सर्व करताना आपल्या हृदयात असलेल्या महाराष्ट्राला जपावे, आपला वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावा, असा विचार मांडण्यात आला. त्या दिशेने आम्ही पा‌ऊल उचलले, आणि त्याचे फलित म्हणजे ऑक्टोबर महिन्यात दोन ठिकाणी बृ. म. मंडळ महोत्सव होत आहेत. फ्लॉरिडामधील चार मंडळे मिळून ओर्‌लँडो येथे महोत्सव साजरा करत आहेत, त्याचबरोबर वॉशिंग्टन डीसी भागातील चार मंडळे मिळून तेथेही एक महोत्सव होतो आहे. तेथील मराठी प्रेमी आप‌आपल्या प्रांतात आलेल्या या संधीचा पूर्ण फायदा घेतील अशी मी आशा करतो.
मागच्या वर्षी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) च्या अधिकार्‍यांनी त्यांच्या महामंडळाचे व बृ. म. मंडळाचे उद्दिष्ट सारखेच असल्याने आपण एकत्र काम करायला हवे, असे सुचवले होते. त्याचाच एक भाग म्हणजे, यंदा आपण सप्टेंबर महिन्यात पाच ठिकाणी (न्यू यॉर्क, शिकागो, लॉस एजंलिस, मॉन्ट्रियाल, टोरांटो) होणार्‍या रोडशोमधे, महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे व मराठी संस्कृती ह्याबद्दल माहिती प्रसारित करीत आहोत, हे सांगायला विशेष आनंद होतो आहे.
कनेक्टिकटमधे "आम्ही बोलतो मराठी" हा एक छान चित्रपट बघायला मिळाला. त्यावेळी श्री विक्रम गोखले, चित्रपटाचे दिग्दर्शक श्री आनंद म्हसवेकर, व डॉ. मीना नेरूरकर यांचा चर्चेचा एक सुंदर कार्यक्रम बघायला मिळाला.
इंग्रजी भाषा ही महाराष्ट्रात कशी फोफावते आहे, व मराठी भाषेला कशी दुय्यम वागणूक मिळते आहे, ह्याबद्दल श्री गोखले यांनी खंत व्यक्त केली. मराठी भाषेला मानाचे स्थान मिळावे म्हणून आमचा प्रयत्न आहे, त्यासाठी अमेरिकेतील मराठी भाषा व संस्कृतीवर प्रेम करणार्‍यांसाठी आम्ही महाराष्ट्राच्या आधी अमेरिकेत हा चित्रपट प्रदर्शित केला असे श्री आनंद म्हसवेकर म्हणाले.
बृ. म. मंडळाच्या मराठी शाळेचे शिक्षक व विद्यार्थी यांनी नवीन शैक्षणिक वर्षाचा श्रीगणेशा केला. आनंदाची गोष्ट म्हणजे ह्यावर्षी शिकागोत नवीन मराठी शाळा सुरू होत आहे. लॉस एजंलिस अधिवेशनाला कॉर्पोरेट स्पॉन्सर्सकडूनही चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे, कार्यक्रमांची निवड प्रक्रियाही लवकरच सुरू हो‌ईल, चांगले कार्यक्रम असतील, तर जरूर कळवावे.
कळावे लोभ असावा.

- सुनील सूर्यवंशी (अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ )
suryawanshi@yahoo.com