Aug, 2014

नमस्कार मंडळी,

उन्हाळ्याच्या सुट्टीत सध्या मुलांबरोबर टीव्हीवर वरती कॉसमॉस ही मालिका बघतो आहे. ती बघत असतांना ह्या विश्वाचा व्याप बघता आपण आणि आपली मानवजात व आपले अस्तित्व किती शुल्लक आहे ह्याची जाणीव होते. परंतु त्याचबरोबर पूर्ण विश्वाची निर्मिती एका ‘गोल्फ’ च्या बॉल एवढ्या छोट्या गोलापासून झाली आहे, तारे, आकाशगंगा, पर्वत, नद्या, किडे, मुंगी, माणूस ह्या सर्वांच्या निर्मितीचा उगम एकच आहे. म्हणून सर्व चराचरामधे एकाच गोष्टीचा अंश आहे वा आपण एकमेकांना कसे ’कनेक्टेड’ आहोत ह्याची जाणीव होते. आपण पूर्वीपासून साधूसंतांकडून ऐकत आलो आहोत, की देव सर्वव्यापी आहे, चराचरात आहे, सजीव, तसेच निर्जीवामधे आहे. तेव्हा त्या सर्वांना हेच तर म्हणायचे नव्हते ना, ह्याची मनात शंका आल्याशिवाय रहात नाही.

भारताचे पंतप्रधान श्री. नरेन्द्र मोदी अमेरिकेत येणार असून त्यांचा स्वागत समारंभ कसा करावा याबाबत अमेरिकेतील अनेक भारतीय सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीस मी उपस्थित होतो. "वादे वादे जायते तत्‍वबोधा" न होता "वादे वादे जायते शीर्षभंगा" होणार की काय असं बराच वेळ वाटत होतं, शेवटी मोदी हे फक्त एका समाजाचे किवा पक्षाचे नेते नसून ते सर्व भारतीयांचे नेते आहेत, हे सर्वांना मनापासून पटले व त्यांचे स्वागत आयोजित करायला सर्वांना समान संधी मिळायला हवी असे सर्वांनी मान्य केले. मॅडिसन स्क्वेअर गार्डन, न्यू यॉर्क येथे त्यांचा भव्य स्वागत समारंभ मोठ्या उत्साहात करूया अशी शपथ घेतली व लोक कामाला लागले.

अमेरिकेत मराठी माणसाने नोकरीच्या क्षेत्रात भरपूर प्रगती केली आहे, काही व्यावसायिक पण आहेत, काहीजण मात्र काहीतरी मोठे स्वप्न बघण्याचे धाडस करतात व ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्नही करतात. गेल्या आठवड्यात कनेटिकट येथील अनिल दिवाण यांच्या कंपनीच्या ‘NanoViricides Inc.’ ह्या नवीन फॅक्टरीच्या उद्‌घाटनासाठी गेलो होतो, nano-particle वापरून बर्ड फ्लू, डेंग्यूसारख्या रोगांच्या विषाणूंचा नायनाट करण्यासाठी ते तंत्रज्ञान विकसित करीत आहेत. त्यावेळी कॉंग्रेसमन जिम हाइम्स म्हणाले "Its just not about bringing the jobs in Connecticut but lives that can be saved worldwide." अनिल दिवाण ह्यांचे काम नक्कीच कौतुकास्पद व अभिमानास्पद आहे.

एकदा मुले हायस्कूलमधे जाऊ लागली, की शाळेच्या अभ्यासात अधिकच व्यग्र होतात. मग त्यांना मराठी शाळेस उपस्थित रहायला पाहिजे तेव्हढा वेळ मिळत नाही. तरीपण अशा मुलांना मराठी शिकण्यासाठी सोयीस्कर व्हावे म्हणून आम्ही ’ब्लॅकबोर्ड’ ह्या कंपनीचे ’virtual classroom’ चे तंत्रज्ञान वापरायचे ठरवले आहे. त्यामुळे उत्तरअमेरिकेतील मुलांना घरी राहून मराठी शिकता येईल. अनेक मुलं ह्या प्रकल्पाचा नक्कीच फायदा करून घेतील अशी आशा करतो.

बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनासाठी प्रमुख पाहुणे व प्रमुख व्यक्ते ह्यांची निवडक यादी तयार झाली आहे, त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे, त्यामुळे लवकरात लवकर निर्णय ठरून नावे जाहीर करायला मिळतील अशी आशा करून तुमचा निरोप घेतो.

तुमचा लोभ असाच कायम राहू द्या, व लवकरच बोलूयात.

- सुनील सूर्यवंशी (अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ )
suryawanshi@yahoo.com