Mar, 2014

नमस्कार मंडळी,
कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा होतो. त्यानिमित्त सर्व मराठी भाषकांना हार्दिक शुभेच्छा! अनिवासी मराठी माणूस शुभेच्छा देण्यापलिकडे मराठीसाठी काय करू शकतो, ह्याचा विचार करणे गरजेचे आहे. मराठीचे शिलेदार बृहन्महाराष्ट्र मंडळ (बृ. म. मं./BMM) व सर्व मराठी मंडळांची कार्यकारिणी मराठीचा वारसा चालवण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध करून देतीलच, परंतु मंडळातील सर्व सभासद म्हणून आपण काय करू शकतो, ह्याचाही विचार करूया! आपली मुले जर शालेय वयाची असतील तर ती बृ. म. मंडळाच्या मराठी शाळेत जाऊ शकतात का? मंडळातील जास्तीतजास्त कार्यक्रमांना हजर राहून स्थानिक कलाकारांना आपण उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतो का? थोडीफार गैरसोय होत असली तरी, महाराष्ट्रातून आलेल्या कलाकारांचा कार्यक्रम उत्साहाने बघायला जातो का? मंडळातील मित्रमंडळींबरोबर आपण एकादा मराठी चित्रपट बघू शकतो का? मराठी अधिवेशन थोडे दूर व महागही वाटले तरी आनंदाने जातो का? ह्या प्रश्नांची उत्तरे जर होकारार्थी मिळाली तर आपण खऱ्या अर्थाने मराठी दिवस साजरा करत आहात, आणि भाषा व वारसा टिकवण्यासाठी मोठा हातभार लावत आहात असे मी मानतो.
२०१४च्या हिवाळी/विन्टर ऑलिंपिक्सला जगाने आनंदाने निरोप दिला. Nothing can beat the human spirit when chasing a dream, ह्याची अनेक उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर असतात, पण तशी उदाहरणे ऑलिंपिक्समधे जास्त दिसतात. फिगर स्केटर माइकल ख्रिस्तिअन मार्टिनेज, ज्याला सरकारची अजिबात आर्थिक मदत मिळाली नाही, त्याने स्वत:चे घरदार विकून ऑलिंपिक्समधे भाग घेतला, आणि फिलीपिनोचा तो ऑलिंपिक्समधील पहिला खेळाडू ठरला. माझ्या शेजारच्या, न्यू यॉर्क राज्यातील मॅथ्यू मॉरटेनसेन गेली १६ वर्षें शर्यत जिंकण्यासाठी झटत होता, त्याने ती शर्यत फक्त ५२ सेकंदात जिंकली. ५२ सेकंदांसाठी १६ वर्षं प्रयत्न करणं अशा स्वप्नाला काय म्हणावे? भारताच्या सहभागातील दयनीय स्थितीबद्दल बोलायला नको, अमेरिकेतील एकादी सेवाभावी संस्था जर हा लेख वाचत असतील, तर त्यांना सांगावासे वाटते, की गोरगरीब लोकांसाठी संस्था काढाच, परंतु तुम्हाला खेळाडूंसाठीही काही करायचे असेल, तर भारतात भरपूर संधी आहे.
आपले बीएमम मार्ट, जिथून आपण बृ. म. मं. संबंधित डीव्हीडी, व काही प्रकाशित पुस्तके विकत घेऊ शकता, त्याचे व्यवस्थापन बघणारे श्री. मोहन रानडे ह्यांचा आपणां सर्वांना परिचय आहेच.
श्री मोहन रानडे बीएमएम मार्टचे सर्व काम अतिशय व्यवस्थितपणे, व उत्साहाने अनेक वर्षांपासून करत आहेत. ते बृ. म. मंडळाचे १९९१-१९९३मधे अध्यक्ष होते. सध्या वृत्ताचे वितरण आणि संपादन-सल्लागार म्हणून काम बघत असतात. बृ. म. मंडळाच्या २०१३च्या अधिवेशनाची डीव्हीडी आता खरेदीसाठी उपलब्ध झाली आहे. आपण ती ऑनलाइन ऑर्डर करू शकता. आपल्याला डीव्हीडी त्वरित हवी असल्यास मोहन रानडे (brihanmm@gmail.com)अथवा आशिष चौघुले (achaughule@gmail.com) यांच्याशी संपर्क करावा.
बृ. म. मंडळाने आयोजित केलेला "कौशल कट्टा -" कार्यक्रम जवळपास १४ मंडळांमधे होणार आहे. त्या संधीचा फायदा आपण घ्यालच. अनेक मंडळांमधे मंगलाष्टक वन्स मोअर व पितृऋण ह्या चित्रपटाचे प्रदर्शन झाले, त्याचा आपण आनंद लुटला असेलच. अ‍ॅन आर्बर व डेट्रॉइट येथे नवीन मराठी शाळा सुरू होत आहे त्याबद्दल तेथील मंडळांच्या कार्यकारिणीचे अभिनंदन.
बृ. म. मंडळ अधिवेशन २०१५साठी बोधचिन्ह व घोषवाक्य स्पर्धा नुकतीच संपली असून अधिवेशन समिती लवकरच बोधचिन्ह व घोषवाक्य जाहीर करतील. निधीसंकलनासाठी नवनवीन योजना घेऊन मार्केटिंग समिती आपल्यापर्यंत पोहोचत आहे. त्याला आपण भरपूर प्रतिसाद द्याल अशी आशा करून निरोप घेतो. परत लवकरच बोलूयात.
जय महाराष्ट्र, जय हिंद, जय अमेरिका!
- सुनील सूर्यवंशी (अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ )
suryawanshi@yahoo.com