Feb, 2014

अध्यक्षीय

नमस्कार मंडळी,
खिडकीतून बाहेर डोकावून बघतो आहे, तर जवळपास १० इंच बर्फ साचला आहे, आणि ७ फॅरन्हाइट एवढे तापमान आहे. माझ्या घराच्या शेजारी जो नेहमी पातळ जॅकेट घालून बर्फ साफ करत असतो, तो च, दोन जॅकेट्स, आणि माकडटोपी घालून काम करतो आहे, हाडांना गोठवणारी, बोचरी थंडी काय असते, ह्याचा अनुभव घेतो आहे. ह्याला कारणीभूत म्हणे, पोलर वोर्टेक्स आहे. पहिल्यांदा याबद्दल ऐकले, तेव्हा कुठल्या तरी भयकथेवर आधारित चित्रपटाचे हे नाव आहे की काय असे वाटले होते. असो. ह्या दु:खात आपण एकटे नाही तर सगळेच (अगदी अमेरिकेच्या दक्षिण भागातील लोक सुध्दा) सहभागी आहोत, म्हणून त्यातला त्यात थोडासा दिलासा. सुपर बॉल च्या दिवशी खेळाडू थंडीत कसे खेळणार आहेत हे माहिती नाही, मात्र आम्ही मात्र घरीबसून मित्रांबरोबर काहीतरी गरम गरम खाद्यपदार्थाचा न,च आस्वाद घेऊ!
एकंदरीत उत्तर अमेरिकेतील मराठी माणसाचा प्रोफाइल बघता असे जाणवते की, उत्तररंगाची आता जास्त गरज भासणार आहे, २०१३ मधे उत्तररंगच्या उपक्रमांमधे आपण ५५+ वयोगटातील मराठी व्यक्तींची नामदर्शिका प्रकाशित केली. चार मंडळात बृहन्महाराष्ट्र (बृ. म.) मंडळाने उत्तररंगावर चर्चासत्रही आयोजित केले. याचे पुढचे पाऊल म्हणजे जास्तीत जास्त ५५ + लोकांना एकत्र कसे आणता येईल, व परस्परांना कशी मदत होईल हे बघायला हवे. न्यू जर्सीमधे, वॉशिंग्टन डीसी- मधे असे ५५ + लोकांचे क्लब आहेत. त्याच प्रकारचे क्लब इतर मंडळात कसे चालू करता येतील, याबद्दल सध्या आमचे विचारमंथन चालू आहे. त्याबाबत, तुमच्या काही सूचना असतील तर बृ. म. मंडळाच्या सचिव सौ. नमिता दांडेकर अथवा उत्तररंग प्रकल्पाचे गेली अनेक वर्षे काम करणारे - सौ. विद्या सप्रे आणि डॉ. अशोक सप्रे यांना जरूर कळवा.
रिटायरमेंटबद्दल असे म्हटले जाते की, Don’t simply retire from something, have something to retire to. यातील "something"चा
थोडा भाग बृ. म. मंडळाच्या आणि उत्तर अमेरिकेतील सर्व मराठी मंडळांच्या पातळीवर न,च साध्य होईल, आणि आम्ही त्यासाठी प्रयत्नशील असू.
मला कनेटिकट मंडळात झालेला प्रसंग आठवतो, मंडळातील सुमारे ८० कलाकार मिळून ' नाते जुने, कनेक्शन नवे' हा कार्यक्रम केला होता.
कार्यक्रमाच्या समारोपाच्या वेळी एक एक करत सगळे कलाकार मंचावर येत होते, आणि त्याचवेळी "लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी.." हे गीत चालू होते, अतिशय सुंदर, भावनाशील वातावरण निर्माण झाले होते. सभागृहात माझ्या शेजारी पुण्याहून आलेल्या आजी बसल्या होत्या, आणि त्यांचे डोळे ओलावले होते. त्या मला म्हणाल्या, असे मराठमोळे प्रसंग पुण्यातही दुर्मिळ होत चालले आहेत, आणि तुम्ही हे सर्व अमेरिकेत टिकवण्याचा प्रयत्न करत आहात, ही फार कौतुकाची गोष्ट आहे. महत्त्वाच्या मुद्दावर येतो, ह्या गाण्याला स्फूर्तीदायक चाल देणारे संगीतकार कौशल इनामदार, व त्यांचे सहकारी ह्यांच्या "कौशल क-" कार्यक्रमाचे बृ. म. मंडळ उत्तर अमेरिकेतील विविध मंडळात आयोजन करत आहे. त्याबद्दल माहिती सर्व मंडळांच्या अध्यक्षांकडे पाठवली आहेच.
थंडीच्या दिवसात आपल्या मंडळातील मित्रांबरोबर एकादा चांगला सिनेमा बघता यावा, म्हणून आम्ही दोन नवीन नावाजलेल्या मराठी चित्रपटाचे वितरण करीत आहोत. "मंगलाष्टक वन्स मोअर" हा सध्याच्या परिस्थितीवर आहे, आणि पितृऋण हा सुधा मूर्तींच्या कादंबरीवरून घेतला आहे. आपल्या मंडळात हा चित्रपट प्रदर्शित करण्याबाबत आपण आपल्या मंडळातील कार्यकारिणीशी संपर्क करावा.
लॉस अँजलिस अधिवेशन समितीने कामाला जोरात सुरुवात केली आहे, हे वेगळे सांगायला नको. अधिवेशनाचे ठिकाण व मुख्य हॉटेल निश्चित झाले आहे. आता चांगले कार्यक्रम आणणे व निधीसंकलन करणे यावर अधिवेशन समितीचा जोर असेल.
कळावे लोभ असावा.
- सुनील सूर्यवंशी (अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ )
suryawanshi@yahoo.com