Dec, 2013

नमस्कार मंडळी,

मागच्या आठवड्यात बोस्टनमधे दोनशेहूंन अधिक स्वयंसेवक श्रमपरिहारासाठी जमली होती, एखादे शुभकार्य झाल्यावर वधुपित्याच्या चेहऱ्यावर जसा आनंदभाव दिसतो तसा आनंदभाव सगळयांचा चेहऱ्यावर दिसत होता. भाषणे फारशी झाली नाहीत. परंतु अधिवेशनाचे मुख्य संयोजक श्री बाळ महाले एक दोन वाक्य बोलले, ते मला नमूद करावासे वाटते. ते म्हणाले "जेव्हा दोनशेहून अधिक स्वयंसेवक निस्वार्थपणे, एकोप्याने, एका ध्येयाने दोन वर्षे एकत्र झटून भव्य दिव्य असे काही घडवितात, तेव्हा असा अनुभव साधासुधा नसून माझ्यासाठी एक स्पिरिचुयल अनुभव होता."

त्याच्याच आदल्या आठवड्यात लॉस अँजलिस मराठीमंडळाच्या स्वयंसेवकांना (LAकरांना) भेटण्याचा योग आला. सर्व समिती-सदस्यांमधे जुन्याचा अनुभव व नव्यांचा उत्साह याचा सुंदर संगम दिसून आला. या बैठकीत पूर्ण वेळ खेळीमेळीचे वातावरण होते.

आगामी अधिवेशनात खाण्यापासून गाण्यापर्यंत, फाटकापासून नाटकापर्यंत, मनमोकळ्या गप्पांपासून गंभीर चर्चेपर्यंत सर्व गोष्टीत लॉस अँजलिस मंडळातील सभासद, कलाकार, उद्योजक या सर्वांचे विचार व सृजनशीलता यांची कमाल दिसणार आहे, यात शंका नाही.

न्यूयॉर्क मंडळाचे अध्यक्ष दिलीप शेट्ये यांचे आमंत्रण स्वीकारून दिवाळीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. पहिल्यांदाच न्यूयॉर्कच्या मंडळात शिकागोच्या मंडळातील आठ कलाकारांनी त्यांचे नाटक वस्त्रहरण सादर केले. एका मंडळातील कार्यक्रम इतर मंडळांत सादर व्हावा, ह्या प्रकल्पाला आमच्या कार्यकारिणीस चांगले यश मिळत आहे. आतापर्यंत उत्तर अमेरिकेतील कलाकारांचे कार्यक्रम पाच ठिकाणी होऊ शकले. हे यशस्वी करण्यामागे कलाकार, त्यांचे स्थानिक मंडळ, बृ. म. मंडळाची कार्यकारिणी, आणि जिथे कार्यक्रम सादर होतो ते मंडळ, ह्या सर्वांचे परिश्रम असतात.

काही दिवसांपूर्वी माझ्या मुलांच्या शाळेच्या जिल्हा/विभाग-व्यवस्थापकांकडून एक पत्र मला मिळाले. त्यांच्या संशोधनातून असे निदर्शनास आले की, हायस्कूलला जाणारी मुले त्यांच्या वयामुळे उशिरा झोपतात, व सकाळी लवकर शाळा असल्यामुळे त्यांची पूर्ण झोप होत नाही. त्याचा परिणाम अभ्यासावर होतो. त्यामुळे पूर्ण झोपेसाठी त्यांची शाळा उशिराने सुरू करावी की काय या बाबतीत त्यांना निर्णय घ्यायचा होता. निर्णय तसा वरकरणी साधा वाटत होता. परंतु व्यवस्थापनाने निर्णयप्रक्रिया ज्या पध्दतीने हाताळली, त्यात तंत्रज्ञानाचा जसा वापर केला, ते कौतुकास्पद होते. सुरुवातीला त्यांनी आर्थिक अंदाजपत्रकावर व इतर मुलांवर काय परिणाम होणार, याचा पूर्ण अंदाज दिला. सर्व पालकांना विविध मार्गांनी मत देण्यास प्रवृत्त केले, आणि पूर्णपणे या निर्णयात सामील करून घेतले. पालकांनीही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. शेवटी बहुतेकांना रुचेल असा निर्णय घेतला गेला हे विशेष. तसाच प्रयत्न लॉस अँजलिस येथील बृ. म. मंडळ अधिवेशनाची समिती करते आहे. माझ्या मनातील अधिवेशन- निबंध, अधिवेशनाचे बोधचिन्ह आणि घोषवाक्य ह्यांची स्पर्धा ठेवण्यात आली आहे. ह्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आपण उत्साहाने सहभागी व्हाल याची खात्री आहे.

"मराठी मन मराठी जन, जोडुनी बम्म अधिवेशनला,

भेटू पुन्हा पुढील सोहळ्यास, हा ऋणानुबंध जपायला..."

धन्यवाद, लवकरच बोलूयात!
- सुनील सूर्यवंशी (अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ)
suryawanshi@yahoo.com