Nov, 2013

नमस्कार मंडळी,
बृहन्महाराष्ट्र वृत्ताच्या सर्व वाचकांना बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या कार्यकारिणीतर्फे दीपावलीच्या शुभेच्छा! हे वर्ष सर्वांना भरभराटीचे व समृद्धीचे जावो ही मनःपूर्वक सदिच्छा!
२६ ऑक्टोबर २०१३ रोजी, न्यू जर्सी येथे, महाराष्ट्र फाउंडेशनच्या निधीसंकलनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग आला. कार्यक्रमाचे प्रमुख आमंत्रित- मराठी व हिंदी लेखक, कौन्सुल जनरल ऑफ इंडिया, श्री ज्ञानेश्वर मुळे ह्यांचे प्रभावी भाषण ऐकायला मिळाले. १९६० सालापर्यंत महाराष्ट्राने भारत देशाला बौद्धिक परंपरा आणि वैचारिक नेतृत्व दिले. फुले, गोखले, टिळक, आंबेडकर हे अतिशय प्रखर बुध्दीचे नेते होते. त्यांच्या कार्यातून आणि विचारसरणीतून जी बौद्धिक उंची गाठली होती, तशी पातळी गाठणे आजकाल अवघड होतंय की काय, असं मत श्री मुळे ह्यांनी व्यक्त केलं. मराठी माणूस बऱ्याचदा हातचं राखून बोलत असतो, शालीन असावे, परंतु कधीकधी "मै मेरी झाशी नही दूंगी" हे सुद्धा तेवढ्याच खमकीने व तेजाने सांगायला हवे, असे श्री मुळे ह्यांनी व्यक्त केलेले विचार नक्कीच स्फूर्तीदायक होते.
कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या सौ. चंद्रकला भार्गव ह्यांनी भारतात लातूर येथे ३० वर्षांपासून चालू असलेल्या आदर्श महिला उद्योग ह्या सेवाभावी संस्थेच्या कामाचा आढावा घेतला. त्यांनी आपले विविध अनुभव उलगडताना, सेवाभावी संस्थेपुढची आव्हाने किती मोठी असतात, आणि लोकांचे प्रश्न सोडवणे किती महत्त्वाचे असते, हे उपस्थितांना सांगितले. त्यांचे हे काम न,च कौतुकास्पद आहे. ते ऐकतांना मला रविंद्रनाथ टागोर ह्यांचे वाक्य आठवले. "I slept and dreamt that life was a joy, I awoke and saw life was a service. I acted as a behold, service was a joy".
महाराष्ट्र फाउंडेशने हा कार्यक्रम यशस्वीरित्या केल्याबद्दल, अध्यक्षा सौ. शैला विद्वांस व अमेरिकेच्या सर्व भागातून आलेले फाउंडेशनचे पदाधिकारी, ह्यांचे अभिनंदन.
सांगायला मोठा आनंद होतोय, की बृ. म. मंडळाच्या सर्व मराठी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, संयोजक ह्या सर्वांच्या प्रयत्नाने, प्रथमच शाळेचा, "अंकुर" नावाचा ई-अंक प्रकाशित करत आहोत. पूर्वी मराठी वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या गोट्या ह्या मालिकेचे अतिशय भावपूर्ण शीर्षकगीत आठवते,
"बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत,
कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात".
पूर्वी मराठी शिकण्याच्या दृष्टीने अमेरिका हे एक खडकाळ माळरान वाटत होते. परंतु आपल्या बृ. म. मंडळाच्या मराठी शाळेच्या रूपाने ओली माती मिळाली आहे, आणि हे मायबोली मराठीचे बियाणे चांगले रुजले जात आहे, असे म्हणायला काही हरकत नाही. आपल्या मुलांचे काम शाळेत कसे चालू आहे, ते बघण्यासाठी खालील वेबलिंकला (संकेतस्थळावरील दुव्याला) http://bmmshala.net/sites/default/files/ankur२०१३.pdf जरूर भेट द्या, व आपला अभिप्राय द्यायला विसरू नका.
दिवाळी, थँक्‌स् गिव्हिंगच्या सुट्ट्यांमधे गरमगरम वडापाव, सामोसा, चहा, ह्याबरोबर एकादा चांगला मराठी चित्रपट सामुदायिकरित्या बघायला मिळण्यासाठी, आमच्या कार्यकारिणीत नव्यानेच समाविष्ट झालेल्या, प्रसाद पानवलकर ह्यांची महाराष्ट्रातील लोकांशी मराठी चित्रपट अमेरिकेतील मंडळांमधे प्रदर्शित करण्याबाबत बोलणी चालू आहेत. त्याबद्दल, आपले स्थानिक मंडळाचे अध्यक्ष आपल्याला माहिती कळवतीलच.
अनेक मराठी मंडळांत २०१४ वर्षासाठी नवीन कार्यकारिणी नियुक्त होऊन २०१३ वर्षातील पदाधिकाऱ्यांचा कार्यभार आता संपत आला असेल. अर्थात् ह्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी मिळून भरपूर काम केल्याचे समाधान त्यांना मिळाले असेलच. त्याचबरोबर आपल्या मंडळातील सभासदही आपल्या योगदानाबद्दल आभारी आहेत.
पुढच्या महिन्यात मी लॉस अँजलिसच्या अधिवेशनाच्या कार्यकर्त्यांना भेटणार आहे. ह्या सर्व स्वयंसेवी कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी मी उत्सुक आहे. त्याचा वृत्तांत पुढील महिन्यात कळवू. परत एकदा दिवाळीच्या शुभेच्छा, आणि लवकरच बोलूयात.
- सुनील सूर्यवंशी (अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ)
suryawanshi@yahoo.com