Sept, 2013

प्रत्येक शुक्रवारी संध्याकाळी आम्ही राहतो त्या कनेटिकटमधील भागातील मराठी मंडळातील १०/१२ कुटुंबाना एकत्र येण्याची घाई असते. बच्चे मंडळींना त्यांच्या मित्रांना भेटायचे असते, बाबा लोकांना डन्किन डोनट्स्मधे बसून कॉफीचा घोट घेत जगाचे प्रश्न सोडवायचे असतात. मुलांच्या आईंना आठवड्याभराच्या गोष्टी एकमेकींना सांगण्याची एक संधी मिळणार असते, पालकातीलच शिक्षिकांची printouts, पुस्तके जमवणे ह्याची लगबग असते. अशी ही एकंदरीत कौटुंबिक शाळा थोड्याफार फरकाने इतर अनेक मंडळातही चालू असते. वातावरण जरी कौटुंबिक असले तरी पुढच्या पिढीपर्यंत आपला वारसा, भाषा पोहोचवण्याची जबाबदारी ही सर्व मंडळी खेळीमेळीच्या वातावरणात आनंदाने पार पाडत असतात. मातृभाषा ही हृदयाची भाषा असते, नेल्सन मंडेला एकदा त्यांच्या भाषणात म्हणाले होते कि "If you talk to a man in a language he understands that goes to his head, if you talk to him in his language that goes to his heart". म्हणूनच की काय आजही भारतात प्रांतीय दूरदर्शन वाहिन्यांचे रेटिंग हे हिंदी व इंग्लिश चॅनेल्स पेक्षा जास्त आहे. आपल्या अमेरिकेत वाढणाऱ्या मुलांना मराठीची पद्धतशीर ओळख करून देण्याकरिता बृ. म. मंडळाने पाच वर्षांपूर्वी मराठी शाळेचे रोपटे लावले. तेच रोपटे आता मोठ्या वृक्षात रुपांतरीत होऊ पाहते आहे. या रोपट्याचे जतन व वृद्धी करण्यामागे अनेकांचे योगदान आहे. अशांमधे, मोलाचे श्रेय द्यावेसे वाटते ते सौ. सुनंदाताई टुमणे ह्यांना.
अनेक वर्षांपासून सुनंदाताई त्यांच्या सहकार्यांबरोबर ह्या शाळेचा प्रकल्प नेटाने पुढे नेत आहेत. त्याचा सविस्तर वृतांत या वृत्तामधे बघायला मिळेल.
ऑगस्ट महिना हा आमच्या कार्यकारिणीचा पहिलाच महिना असूनही सुरुवात चांगली झाली आहे. सॅक्रॅमेंटो, आणि आल्बनी येथील मराठी मंडळे बृ. म. मंडळाच्या परिवारात येत आहेत. ऑस्टिन, क्लिव्हलँड, आल्बनी आणि सॅक्रॅमेंटो या मंडळांत यावर्षी प्रथमच मराठी शाळा सुरू होत आहे. उ त्तर अमेरिकेतील कलाकारांना जास्तीत जास्त चांगला वाव मिळावा व मंडळांना चांगले कार्यक्रम मिळावेत ह्या उद्देशाने बृ. म. मंडळ कार्यकारिणीने यावर्षी हाती घेतलेल्या प्रकल्पाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे थोड्याच दिवसात एका मंडळांतील कलाकारांनी बसवलेले कार्यक्रम इतर आठ दहा मंडळात झाल्यास त्यात आश्चर्य वाटणार नाही. फॅमिली ड्रामा ह्या नाटकाचा अमेरिकेतील दौरा होताहोता राहिला. दिवसेंदिवस भारतातील कलाकारांना अमेरिकेत आणणे आव्हानात्मक होते आहे. त्यासाठी जास्तीतजास्त पर्याय उपलब्ध करून, कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी आमची कार्यकारिणी प्रयत्नशील आहे.
गणरायाचे लवकरच आगमन होणार आहे, आणि सर्व मंडळांत त्याची जय्यत तयारी चालू झाली असेल याबद्दल शंका नाही. बृ. वृत्ताच्या सर्व वाचकांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा! त्याच बरोबर, मी आवाहन करतो की, जर आपण अनेक दिवसांत मंडळांना भेटी दिल्या नसतील तर जरूर भेट द्या. आपल्या उपस्थितीने आणि सहभागाने मंडळातील कार्यकर्त्यांचा उत्साह वाढत असतो.
लॉंज अँजलिस, २०१५, आणि प्रॉव्हिडन्स, २०१३ च्या बृ. म. मंडळ अधिवेशन समितींची या अधिवेशनाविषयी माहितीची देवाणघेवाण लवकरच सुरू होत आहे. मागच्या वृत्तात पाठवलेल्या विनंतीनुसार ज्यांनी अधिवेशाबाबत सूचना पाठवल्या, त्यांचे मनापासून आभार.
कळावे, लोभ असावा.

आपला,
सुनील सूर्यवंशी (अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ )
suryawanshi@yahoo.com