Aug, 2013

एखाद्या कामाला सुरुवात करणे तसे सोपे असते, सुरुवातीला एक उत्साह असतो, हौस असते, नाविन्याची ओढ असते, परंतु तेच काम सतत चालू ठेवणे तितकेसे सोपे नसते. मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे की गेल्या बत्तीस वर्षांपासून आपली ही जिव्हाळ्याची संस्था बृहन्महाराष्ट्र मंडळ मोठया दिमाखाने वाटचाल करत आहे. याचे श्रेय संस्थापक, आतापर्यंतचे सर्व अध्यक्ष, कार्यकारिणी, अधिवेशनाचे संयोजक व शेकडो स्वयंसेवक यांना जाते. त्या सर्वांना मानाचा मुजरा करत मोठ्या उत्साहाने व आनंदाने कामाला सुरुवात करतो आहे.

मी नाशिक जिल्ह्यातील, मुल्हेर ह्या गावी दहावीपर्यंत शिकलो, आमचे गाव तसे छोटे, परंतु सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा लाभलेले. लहानपणापासून भजनं, प्रवचनं आणि कीर्तने ऐकीत वाढलो, त्यामुळे मराठीशी व मराठी संस्कृतीशी कायमची नाळ बांधली गेली. पुण्यात महाविद्यालयात खऱ्या अर्थाने सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली, Rotaract club ह्या संस्थेत कार्यरत असतांना कळले की, अनेक व्यक्ती एकत्र आल्या की विचार वेगळेवेगळे असतात, परंतु त्याचबरोबर सर्वांगाने विचार करून एकत्र काम करणे अतिशय महत्त्वाचे असते.

गेल्या १४ वर्षात कनेक्टिकट मंडळाचे कार्य पुढे नेण्याकरिता अनेक पदावर काम करायला मिळाले व आयुष्यभरासाठी मित्र जमवले. तशीच संधी मला बृहन्महाराष्ट्र मंडळावर दिलीत व माझ्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळण्यासाठी जो विश्वास दाखवलात त्याबद्दल उत्तर अमेरिकेतील सर्व मराठी मंडळांचे प्रतिनिधी, आजी व माजी अध्यक्ष यांचे मन:पूर्वक आभार.

ठेविले अनंते तैसेचि रहावे ह्या विचारसरणीला दूर सारून आमच्या कार्यकारिणीने मोठ्या उत्साहाने कामाला सुरुवात केली आहे. आपल्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या संविधान-घटनेला प्रमाणमात्र धरून, ज्यांच्यापर्यंत बृहन्महाराष्ट्र मंडळ पोहोचले नाही त्यांच्यापर्यंत ते कसे पोहोचेल; आणि ज्यांना बृहन्महाराष्ट्र मंडळ माहीत आहे त्यांची त्याबद्दल आत्मियता कशी वाढेल, मंडळामंडळातील संवाद वाढवून एकमेकांना सहाय्य करून, जास्तीत जास्त मराठीजनांना एकत्र कसे आणता येईल यासाठी आमची कार्यकारिणी सर्वतोपरी झटेल. माझ्यासह, नमिता दांडेकर, मोहित चिटणीस, अंजली अंतुरकर, अनुपा देवगावकर, अमोल फुलांबरकर, नितीन जोशी, सोना भिडे यांची कार्यकारिणीवर निवड झालेली आहे, तसेच सल्लागार समितीवर गिरीश ठकार व आशिष चौघुले यांची निवड झाली आहे. ह्या सर्व माझ्या सोबत्यांचा अनुभव व कार्यक्षमता बघून विशेष आनंद होतो आहे.

आमच्या कामाची विभागणी झाली आहे. प्रत्येक उपक्रमासाठी आम्ही काही उद्दिष्टे ठरवली आहेत, ती उद्दिष्टे सफल करण्यासाठी आपणां सर्वांचे सहकार्य व लोभ मिळेल याबद्दल मनात शंका नाही.

आपले पुढचे अधिवेशन लॉस अँजलिस येथे करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी शैलेश शेट्ये व त्यांचे अनेक सहकारी यांनी मोठ्या उत्साहाने नारळ फोडला आहे. हा आनंदसोहळा मोठ्या थाटामाटात व्हायला हवाच, पण त्याचबरोबर, परस्पर संवाद साधण्यासाठी व स्नेहवृध्दीसाठी अधिवेशन व्हायला हवं. त्यासाठी काही सूचना असतील तर आमच्या कार्यकारिणीला जरूर कळवा.

कळावे लोभ असावा.

आपला,

सुनील सूर्यवंशी
अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ
suryawanshi@yahoo.com