June 2012

बृहन्महाराष्ट्र मंडळ - अध्यक्षीय: जून, २०१२

मंडळी नमस्कार,
माझ्या लहानपणी, जून महिना म्हणजे ऐन लगबगीचा. उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकणात जाऊन खाल्लेले आंबे, फणस, नदीजवळच्या सूरपारंब्या,पारावर रंगलेल्या गजाली यांच्या आठवणीत रममाण होतच नवीन शालेय वर्षाची तयारी सुरू व्हायची. सुट्टीवरून परत आल्यावर आ्ठवडाभरात नैऋत्य मौसमी वाऱ्यांच्या आगमनाआधी रेनकोट, गमबूट, यांची तजवीज करायची. अमेरिकेत आल्यावर उन्हाळ्याच्या सुट्टीची व्याख्याच बदली. अशी सुट्टी संपून महाराष्ट्रातील मुलांची शाळा सुरू होते तेव्हा आपली मुले शाळा कॉलेजला सुट्टी असल्याने घरी येतात. शालेय मुलांचे पालक आपली मुले सर्वगुणसंपन्न कशी होतील याकडे विशेष लक्ष देतात. मग नुसत्या हुंदडण्यापेक्षा स्पोर्ट्‌स, आर्ट्‌स वगैरे विषयांची शिबिरे सुरू होतात. काही पालक तर महिना दोन महिन्याची सुट्टी घेऊन मुलांना भारतात घेऊन जातात. साहजिकच अमेरिकेतल्या मंडळांमधे भारतातल्या कलाकारांच्या कार्यक्रमांची संख्या रोडावते. परवा मला मुंबईच्या एका प्रसिध्द गायकाचा फोन आला होता ते विचारत होते, ’अमेरिकेत कार्यक्रमासाठी योग्य सिझन कोणता?’ तेव्हा मी त्यांना लगेच सांगितले की पाडवा ते मेमोरियल डे आणि मग गणपती ते दिवाळी असे एकूण सहा महिने एखाद्या हाय प्रोफ़ाइल बिग बजेट कार्यक्रमासाठी योग्य.

हाय प्रोफ़ाइल वरून आठवलं. बृहन्महाराष्ट्र मंडळ (बृ. म. मं.) आयोजित ’वाह गुरू’ नाटकाचा अमेरिकेतील दौरा २० मेला यशस्वीरित्या पूर्ण झाला. शेवटच्या प्रयोगाला मी जातीने हजर होतो.

Inline image 1

दिलीप प्रभावळकर, अद्वैत दादरकर यांचा अभिनय, फणसाळकरांचे लेखन, विजय केंकरे यांचे दिग्दर्शन, सुयोगची निर्मिती- प्रत्येक विभागात डावे / उजवे करणे कठीण होते. बऱ्याच महिन्यांनी एक परिपूर्ण कलाकृती बघण्याचे एक प्रेक्षक म्हणून तर समाधान मिळालेच, पण त्याही पेक्षा बृ. म. मंडळातर्फे एक अद्वितीय नाट्याविष्कार अमेरिकेतल्या रसिकांसमोर ठेवल्याबद्दलचे समाधान आणि कृतकृत्यता जास्त होती. आवर्जून सांगावेसे वाटत की शेवटच्या प्रयोगानंतर सौ. सुनिता फूटवाला यांनी बृ. म. मंडळाच्या कार्याबद्दल आपुलकीने बृ. म. मंडळाला २५० डॉलर्स देणगीसह पुढील उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या. एक महिन्याचा हा दौरा, त्या आधीची कलाकारांच्या व्हिसासाठी धावपळ, मंडळांबरोबर कॉन्फरन्स कॉल्स, या सर्व गोष्टींसाठी ही पावतीच नाही का? या दौऱ्यासाठी आमच्या कार्यकारी समितीवरील डॅलसचे राहूल कर्णिक यांचा विशेष उल्लेख करतो. त्यांनी या दौऱ्याच्या यशस्वितेसाठी खूप मेहेनत घेतली. प्रत्येक मंडळाच्या स्वयंसेवकांचेहि आभार मानावे तेव्हढे थोडेच!

यंदा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मराठी भाषिक मंडळ, टोरांटो हे विश्व मराठी साहित्य संमेलन भरवत आहे. त्यानिमित्ताने जगभरातल्या साहित्यिकांना भेटण्याची, वार्तालाप करण्याची एक उत्तम संधी आपल्या रसिकांना उपलब्ध होणार आहे. तुमच्यापैकी बर्‍याच साहित्यप्रेमींची टोरांटोला भेट होईलच.

बृ. म. मंडळाच्या बॉस्टन येथील आगामी अधिवेशनाच्या समितीबरोबर एकत्र काम करत बृ. म. मंडळ ’सारेगमा’ ही स्पर्धा उत्तर अमेरिकेत घेणार आहे. उत्तर अमेरिकेतल्या तानसेनांना आपली गुणवत्ता दाखवण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. स्पर्धेची अंतिम फेरी अधिवेशनात ’प्राइम टाईम ’मधे मुख्य व्यासपीठावर होईल. बृ. म. मंडळ स्पर्धा-आयोजक मंडळाला आर्थिक तसेच जाहिरातीसाठी मदत लागेल. याबद्दल अधिक माहिती अधिवेशनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इतर काही

कार्यक्रमांबद्दल पुढील अंकात कळवीनच. वृत्ताच्या वाचकांना उन्हाळ्याच्या सुट्टीच्या शुभेच्छा!

कळावे लोभ असावा, आपला

आशिष चौघुले (अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ, उत्तर अमेरिका)
ईमेल: achaughule@gmail.com

फोन: 302-559-1367