March 2012

मंडळी, नमस्कार!

    कळविण्यास अत्यंत खेद वाटतो की बृहन्महाराष्ट्र मंडळाचे (बृ. म. मंडळ) विश्वस्त श्री. आनंद जोशी यांचे १७ फेब्रुवारी रोजी ह्रदयविकाराच्या झटक्याने पुण्यात निधन झाले. श्री. आनंद यांच्या निकटवर्तीयांनी ती बातमी कळविली. क्षणभर खरंच वाटेना. आनंद जोशी आणि माझा परिचय हा गेल्या ५-६ वर्षांचा. पहिल्यांदा आमची ओळख झाली ती त्यांची मुलगी हेमांगी हिच्या माय मराठी प्रकल्पाच्या संदर्भात. २०११ च्या जुलै मधे  मी बृ. म. मंडळ अध्यक्षपदावर निवडून आल्यावर मग आमचा नियमीत संपर्क होऊ लागला.   

खरं तर या वयात लोक निवृत्त होऊन एखादा छंद जोपासतात. काही जण गोल्फ गेम वर लक्ष केंद्रीत करतात, जगप्रवास करतात, पण आनंद जोशी हे एक अजब रसायन होते. त्यांचा कामाचा तसेच आकलनाचा झपाटा प्रचंड होता. मराठी शाळा, मैत्र, उत्तररंग, नृपो, अधिवेशन या आणि इतर बऱ्याच बृ. म. मंडळाच्या उपक्रमात त्यांचे सिंहाचे योगदान होते. आमची शेवटची प्रत्यक्षात भेट झाली ती मराठी विश्व न्यूजर्सीच्या दिवाळी समारंभात. व्यासपीठावरुन मी त्यांचे नाव घेतल्यावर सभासदांनी त्यांना जी दाद दिली तेव्हा ते सद्गदित झाले होते. खरं तर जानेवारीत ते जागतिक मराठी परिषदेला माझ्याबरोबर येणार होते. पण काही कारणांमुळे त्यांना जमलं नाही.  We all lost a great friend, great mentor & above all a great human being. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो. आनंद जोशी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी/eulogy लिहिण्यासाठी click or visit  http://bmmonline.org/node/213 

As one says, the show must go on.

     फेब्रुवारी महिना सिंहासारखा आला आणि शेळीसारखा गेला. अमेरिकेत संपूर्ण नॉर्थ ईस्ट मधे औषधापुरताही स्नो पडला नाही.  आपल्यापैकी बऱ्याच जणांसाठी हा one of the best winter असेल. नाही म्हणायला स्की करणाऱ्यांची थोडी पंचाईत झाली असेल. हा सौम्य हिवाळा आगामी स्प्रिंग सीझन मधे fun fishing करणाऱ्यांसाठी एक वरदान ठरणार आहे. वॉल स्ट्रीटने सुद्धा या सौम्य हिवाळ्याचे retail business,   heating   oil,   infrastructure  support च्या  दृष्टीने स्वागतच केले आहे.

   आता थोडं बृ. म. मंडळाच्या आगामी कार्यक्रमांविषयी. मैत्र चे   अधिवेशन ६ ते ८ जुलैच्या दरम्यान डेट्रॉईट येथे होत आहे. मैत्रचे अध्यक्ष शिरीष सबनीस आणि त्यांचे सहकारी हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी झटत आहेत. आपली संस्कृती, परंपरा, भाषा पुढच्या पिढीने वृध्दिंगत करण्यासाठी मैत्र २०१२ अधिवेशनामधे सहभागी व्हा. जर तुम्हाला जमत नसेल तर १८ ते ३५  वयोगटातल्या  तुमच्या  नातेवाईकांना  त्याबद्दल जरुर कळवा. अधिक माहितीसाठी www.motorcitymaiytra.com या संकेतस्थळाला भेट द्या.

    ‘वाह गुरु’ या नाटकाची तयारी व्यवस्थित चालू आहे. अमेरिकेत ९ शहरात होणाऱ्या ह्या नाट्य प्रयोगांबद्दल अधिक माहिती ह्या अंकात पान क.४ वर दिली आहेच. मोठ्या संख्येने हे नाटक पाहण्यासाठी जा आणि २२ पुरस्कार मिळालेले हे नाटक प्रत्यक्ष अनुभवा.

  २० मार्च पासून स्प्रिंगचे आगमन होतेय. मराठी मंडळात पाडव्याचे कार्यक्रम सुरु होतील. २-३ मंडळामधे मी स्वत: त्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहे. ८ मार्च ह्या जागतिक महिला दिनानिमित्त, बृ. म. मं. परिवाराच्या समस्त महिलांना शुभेच्छा. ८ मार्चला होळीही आहे (तसेच अस्मादिकांचा वाढदिवस). होळीच्या रंगात रंगून जा, गुंगून जा, समरस व्हा. होळीच्या रंगावरुन नकळत सुरेश भटांच्या ओळी आठवतात -  रंगुनी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा

                        गुंतुनी गुंत्यात साऱ्या, पाय माझा मोकळा!

                                                       आपला

                                                      आशिष चौघुले ( अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ )
                                                             
ईमेल: achaughule@gmail.com

                                                                                                  फोन: 302-559-1367