मला अजूनही आठवतंय |
February 2012 Report
Submitted by admin on Fri, 02/10/2012 - 21:03
नमस्कार मंडळी, शेवटी पडणार पडणार म्हणून वाट बघून शिणून गेल्यानंतर गेल्या आठवड्यात आमच्याकडे एकदाचा बर्फ झाला. पण मागच्या वर्षी याच सुमाराला दणकून म्हणजे सुमारे दोन-अडीच फूट बर्फ काही तासांत पडून गेल्याचा आठवणीत राहिल्याने हा इटुकला बर्फ म्हणजे "हॅ, किस झाड की पत्ती!" असे म्हणून तो काढूनही टाकला. अशा कुठच्या थंडीपावसाच्या दिवशी नुसतेच घरात कोंडून बसण्यापेक्षा बाहेर भटकून येण्यात गंमत असते. पण आमच्याकडे बाहेर पडण्याअगोदर , बाहेर हवा कशी असेल हे पहावे लागते. अशा वेळी बॉस्टनच्या इन-डोअर म्युझियम्सची वारी छान वाटते. पाऊस किंवा थंडीच्या दिवशी बाहेर जाऊन उगाच कुडकुडण्यापेक्षा छान उबदार म्युझियममधे फिरणे, उष्णकटिबंधातून आलेल्या मला अतिशय प्रिय आहे! म्युझियम ऑफ फाईन आर्टस्, म्युझियम ऑफ सायन्स आणि बॉस्टन चिल्ड्रेन्स म्युझियम ही इथली काही महत्त्वाची संग्रहालये. या संग्रहालयांखेरीज अजून एक वेगळे म्हणजे बॉस्टनजवळील केंब्रिजमधले हार्वर्डचे नॅचरल हिस्टरी म्युझियम. म्युझियम ऑफ फाईन आर्टस् हे बॉस्टनमधील हंटिग्टन अॅवेन्यूवरचे कलासंग्रहालय चांगलेच भव्य आहे. निओ-क्लासिकल शैलीत बांधलेली ही मुख्य बिल्डिंग उघडते ती हंटिग्टन अवेन्यूवर. या प्रवेशद्वारापाशी एक मोठे शिल्प आहे - खरेतर संग्रहालयांच्या विस्ताराच्या तुलनेत ते तसे लहानसे असल्याने पट्कन नजरेत येत नाही. ते आहे एका घोड्यावर स्वार असलेल्या एका "इंडियन" अमेरिकन वीराचे - सायरस डॅलिन नावाच्या अमेरिकन शिल्पकाराने तयार केलेले. या शिल्पाचे नाव आहे "Appeal to the Great Spirit ". या शिल्पात वीर आणि घोडा एका जागी स्तब्ध आहेत, वीराची मांड पक्की आहे, पण बहुदा संकटावर मात करण्याची शक्यता नाही, आकाशातल्या शक्तीकडून मदतीसाठी हात पसरले आहेत. घोड्याच्या चेहर्यावरही हे समजल्याचे काहीसे करूण आणि गंभीर भाव आणि तरीही आज्ञेसाठी टवकारलेले कान. हा पुतळा बघताना मनाची विचित्र स्थिती होते - एका बाजूला हंटिग्टन अवेन्यूवरून गाड्या जोराने येत-जात आपल्याला सध्याच्या काळाची जाणीव करून देत असतात, आणि दुसरीकडे हा दुसर्या काळातला कोणतातरी क्षण असा स्थिर झाला आहे असे वाटते. ज्यांना इजिप्त, भारत, तिबेट, येथील काही उत्तमोत्तम शिल्पांचा संग्रह बघण्याची इच्छा आहे, अशांना बॉस्टनमधील हे ठिकाण नक्की आवडेल असे वाटते. येथे मोहेंजोदारो येथील लहानशी खेळणी जी काहींनी भारतात बालभारतीच्या पुस्तकांमधेच बघितलेली असतात, तसेच शुंगकालीन तसेच गुप्तकालीन शिल्पांचे संग्रह वेगळ्या दालनात मांडून ठेवले आहेत. अलिकडे इथे राजपूत चित्रकलेचे प्रदर्शन भरले आहे. देशाबाहेर येऊन आपल्याच देशातील एखादा प्राचीन काळ बघण्याचा हा अनुभव वेगळाच. अशीच येथे विविध देशांमधील चित्रकारांची सुंदर प्रदर्शने अनेकदा भरत असतात. विसाव्या शतकाच्या सुरूवातीच्या काळातील काही अमेरिकन चित्रकारांची रेखाटलेली चित्रेही येथे आहेत. उन्हाळ्यात कधीकधी नीट आराखडा करून गेले तर काही स्टुडिओ, कार्यशाळांनाही हजेरी लावता येऊ शकते. जाणकारांना इथे कलेचा खजिनाच सापडेल असे वाटते. तसेच मुलांचे एक अतिशय आवडते ठिकाण - म्युझियम ऑफ सायन्स हे बॉस्टनच्या अगदीच जवळ चार्ल्स नदीवर केंब्रिजमधे आहे. मुलांसाठी 'लाइटनिंग' (Lightning!) प्रदर्शन आणि सोलर कोस्टर सिम्युलेटर, आयमॅक्स थिएटर, अशी अनेक आकर्षणे येथे आहेत. नॅचरल हिस्टरी म्युझियममधे ठेवलेली वनस्पतीशास्त्राच्या अभ्यासासाठी काच वितळवून केलेली खरी वाटावी अशी फुले, पाने, देठ हे सर्व आपल्याला थक्क करून टाकतात. या संग्रहालयांमधे गेल्यानंतर दरवेळी काहीतरी नवीन सापडते असा अनुभव आहे. बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या येताना आधीपासून नीट आयोजन केल्यांस यापैकी काही ठिकाणांना अधिवेशन संपल्यावर किंवा अधिवेशनाआधी भेट द्यायला तुम्हाला नक्की आवडेल, असे वाटते. अलिकडेच न्यू इंग्लंड मराठी मंडळाच्या संक्रांतीचा कार्यक्रम पार पडला. बृ. म. मंडळाच्या अधिवेशनाची तयारी जोरदार सुरू झाली आहे. कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमाची तयारी कितपत होते आहे यांचं एक मोजमाप म्हणजे कार्यक्रमासाठी उभी होणारी आर्थिक मदत. बॉस्टनकरांनी आतापर्यंत फक्त वैयक्तिक देणग्यांमधून १ लाख डॉलरची गंगाजळी अधिवेशनासाठी गोळा केली आहे आणि हो, ते सगळे चेक वटले आहेत याची खात्री करूनच ही बातमी देते आहे. :) अधिवेशनाच्या खर्चाच्या मानाने ही रक्कम खूपच कमी असली तरी, मराठी माणसाला ही रक्कम नेहमीच मैलाचा दगड वाटत आली आहे. तो दगड गाठल्यामुळे कार्यकर्त्यांमधे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच अधिवेशनाच्या संयोजकांच्या वतीने नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या निमित्ताने पाठवलेली सुंदर शुभेच्छा पत्रे (ग्रीटिंग्ज कार्डे ) देणगीदारांपर्यंत पोचली आहेत. ही कार्डे पाठवण्याचा निर्णय होताच केवळ तीन दिवसात डिजाईनसकट तयार करून, छापून, आणि पोस्टात टाकून अजय गल्लेवाले, शिल्पा ढमढेरे, बाळ महाले, अविनाश पाध्ये आणि त्यांच्या अनेक सहकार्यांनी (ज्यांत मुलांसाठी कार्यक्रम समितीच्या पदाधिकारी असलेल्या सौ. अनघा सिंग यांचे भारतातून आलेले वडीलही उत्साहाने सहभागी झाले) एक विक्रमच केला, असे म्हणायला हरकत नाही. मनुष्यबळ (एच. आर.) समितीच्या सौ. अदिती थत्ते आणि सौ. हेमांगी आपटे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याच्या दृष्टीने एक इ-पत्रक सुरू केले आहे. माहितीतंत्रज्ञान समितीने (आयटी) बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या संकेतस्थळासाठी तसेच अधिवेशनाच्या दृष्टीने रंगसंगती कशी असावी याचा बारीक विचार सुरू केला आहे. मार्केटिंग कमिटीला घोषवाक्य आणि प्रतीक यांच्या स्पर्धेचा निकाल आता लवकरच जाहीर करता येईल याची चाहूल लागली आहे. तसेच विविध ठिकाणच्या मराठी मंडळींपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने काही आकर्षक चित्रफितीही तयार होत आहेत. याची माहिती पुढील अंकातून तुमच्यापर्यंत पोहोचवूच! भेटू या लवकरच. - चित्रा देशपांडे (बॉस्टन, मॅसॅच्युसेट्स)
|
BMM Vrutta |