मला अजूनही आठवतंय |
January 2012 Report
Submitted by admin on Mon, 01/16/2012 - 12:49
बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या सर्व पदाधिकार्यांना, सभासदांना आणि हितचिंतकांना २०१२चे हे वर्ष सुखाचे, आरोग्यपूर्ण आणि समृद्धीचे जावो अशा शुभेच्छा! जानेवारीत साजर्या होणार्या संक्रांतीच्या सणानिमित्तानेही अनेक हार्दिक शुभेच्छा. बॉस्टनचा एरवीचा जानेवारीचा महिना म्हटला की मनात ओलसर हवा, थंडी, गढूळलेला सूर्य असे नजरेसमोर येते. पण गेले काही दिवस नेहमीपेक्षा वेगळेच गेले आहेत. पानगळी नंतर झाडे नेहमीप्रमाणे खराट्यासारखी तर झाली आहेत, पण बर्फ काही पडलेला नाही. येथली लहान मुले बर्फ न पडल्याने आई-बापांपाशी कुरकूर करत आहेत. भरपूर हिमवर्षाव होऊन, स्नो-इमर्जन्सी जाहीर होऊन, शाळेला सुटी मिळून घरी राहता येण्यातली मजा कशी काय मिळणार, किंवा मिळणारच नाही की काय, अशा प्रचंड काळजीत आहेत. मात्र आम्ही मोठे लोक अजून बर्फ काढण्याची वेळ लांबणीवर पडते आहे म्हणून आनंदातच आहोत! पण हे काही खरे नाही. आपला बर्फ काढण्याचा पराक्रम चारचौघांत कौतुकाने त्यांना कंटाळा येईपर्यंत सांगता यावा म्हणून तरी, नांवासाठी का होईना बर्फ लवकरच पडावा अशी इच्छा होते आहे! यंदा विशेष थंडी न पडण्याचा एक तोटा झाला. तो असा की बॉस्टनमधील आईस स्कल्प्चर्स (बर्फाची शिल्पे) नेहमीप्रमाणे दिसत नाहीत असे आमच्या बॉस्टन-कॉमनच्या वारीत लक्षात आले. नेहमी ३१ डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान बॉस्टन कॉमन येथे लोक ही शिल्पे बघायला हजेरी लावतात. आम्हीही नेहमीप्रमाणे ह्यावर्षी तेथे गेलो होतोच. बॉस्टन कॉमन हे साधारण पन्नास एकरांचे बॉस्टनच्या मध्यवर्ती भागातील अमेरिकेतील सर्वात जुन्या पार्कचे नांव आहे. बॉस्टनचा सुप्रसिद्ध फ्रीडम ट्रेल येथूनच सुरू होतो. इ. स. १८३०पर्यंत या ठिकाणी गुरे चरत, १८१७ पर्यंत गुन्हेगारांना सार्वजनिकरित्या प्राणदंडही दिला जायी असे कळते! आता मात्र पार्कचे स्वरूप बदलले आहे. एका रस्त्याने विभागला गेलेल्या या पार्कमधे थंडीचे दिवस वगळता अनेक सुरेख वृक्ष, उद्याने, तळी, पुतळे, पक्षी असे विहंगम दृश्य असते. येथे पर्यटकांची गर्दी असूनही कधी कंटाळवाणे होत नाही. कधीही आत या, आणि फिरा; पुरेसे फिरून झाले की बॉस्टनची वर्दळ बघायला बाहेर पडा असे सहज करता येते. लगेचच बाहेर बीकन हिल (Beacon Hill) वरील बरीच लहान-मोठी दुकाने, बॉस्टनचे खास जुने शहरी रूप दिसेल असे चिंचोळे रस्ते, कॉफी-शॉप्स, स्टेट हाऊस असा एकंदर इथला नूर असतो. येथून जवळच ट्रिनिटी चर्चजवळही बर्फाची शिल्पे असतात. यंदा शिल्पांची कल्पना होती माया संस्कृतीतील कॅलेंडर! नेहमीप्रमाणे यंदाही कलाकारांनी खूप कष्ट घेऊन शिल्पे बनवल्याचे दिसत होते, पण पुरेशा थंडीअभावी काही बर्फाचे पाणी होऊन जात होते! पण तरी लोकांचा उत्साह कमी नव्हता. ३० डिसेंबरला सकाळी बॉस्टनला गेलो तेव्हा मात्र बर्फ नसला तरी कडक थंडी होती. २८ अंश फॅ. तपमानामधे सगळा जामानिमा करून बॉस्टनमध्ये भटकण्याची गंमत वेगळीच. बृहन्महाराष्ट्र मंडळाचे बॉस्टन अधिवेशन २०१३ मध्ये जेव्हा होईल तेव्हा जुलै महिना असेल. हवा बरीच सुखदायक, हवेतही बोचरी थंडी नसेल. झाडांना पाने असतील, वातावरणात अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनाची हवा असेल. थंडगार बर्फाळ हवा रुचत नसली तर सुखदायक हवेत बॉस्टनला येण्याची संधी तुम्हाला आहेच! अधिवेशनाला अजून दीड वर्ष असले तरी वेळ कसा निघून जातो कळत नाही. अशीच स्वतःची कामे सांभाळत या वर्षी अधिवेशनाच्या वेगवेगळ्या समितींमधे खूप कामे चालली आहेत. विविध समित्यांच्या प्रमुखांची आता लवकरच बैठक घेणार आहे. गेल्या महिन्यात काही घोषवाक्ये आणि काही प्रतिक (लोगो) ह्यांच्या प्रवेशिका आमच्याकडे आल्या आहेत. अधिवेशन समितीने प्रवेशिका पाठवण्याची मुदत ३० जानेवारी २०१२ पर्यंत वाढवली आहे. स्पर्धेचे इतर नियम आणि प्रवेशिका पाठवण्याची माहिती http://bmm2013boston.com/ ह्या संकेतस्थळावर मिळेल. तेव्हा वाढीव मुदतीचा उपयोग करून तुमच्याकडून अधिक प्रवेशिका येतील असे अपेक्षित आहे. परत एकदा तुम्हाला सर्वांना या वर्षारंभाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा! - चित्रा देशपांडे (बॉस्टन, मॅसॅच्युसेट्स)
|
BMM Vrutta |