October 2011

      मंडळी नमस्कार, सप्टेंबर महिना उत्तर अमेरिकेतल्या प्रत्येक मंडळात धामधुमीचा गेला. यंदा गणेशोत्सव सप्टेंबर मध्ये आल्याने बऱ्याच मंडळांतून स्थानिक कलाकारांच्या कार्यक्रमांना प्राधान्य होते. कारण उन्हाळी सुट्टी नंतरच्या पहिल्या कार्यक्रमात सर्वांना भेटण्याची आतुरता असते.

      बृहन्महाराष्ट्र मंडळ म्हणजे उत्तर अमेरिकेतल्या सर्व महाराष्ट्र मंडळांची एक Apex body. वृत्ताद्वारे मी तुम्हा सर्वांशी संपर्क साधतोच पण या पुढच्या २ वर्षांमध्ये मला उत्तर अमेरिकेतल्या प्रत्येक मंडळाला भेटी द्यायच्या आहेत. पाडवा, महाराष्ट्र दिन, गणपती, दसरा, दिवाळी अशा सणांमध्ये आणि इतर सोहळ्यांद्वारे तुमच्या मंडळातल्या सभासदांबरोबर संवाद साधायचाय. या माझ्या उद्देशाचा शुभारंभ ४ सप्टेंबरला महाराष्ट्र मंडळ, न्यू यॉर्क येथे झाला.

      अध्यक्ष निशांत बागुल आणि उपाध्यक्ष दिलीप शेट्ये यांच्या प्रेमळ आमंत्रणाने तिथल्या कार्यक्रमात मी भाग घेतला. लहानपणी गणपतीला कोकणात राजापूरला जायचो. तिथे गणपतीच्या आरत्या म्हणताना गावातले २०-३० जण ढोल, झांजा घे‌ऊन घरोघरी जा‌ऊन आरत्या म्हणायचे. कोण कुठली नवीन आरती पोतडीतून काढतो यात अहमहमिका असायची. अचानक न्यू यॉर्क मध्ये त्याची आठवण झाली आणि मी चक्क एक वेगळी आरती म्हटली सुद्धा. स्थळ, काळ, वेळ बदलली तरी मनुष्याची पठडी बदलत नाही हेच खरे.

      १७ सप्टेंबरला Boston Convention च्या Volunteers बरोबर Kick off meeting झाली. ४ तास चाललेल्या आमच्या meeting चे आयोजन बाळ महाले, अविनाश पाध्ये, अदिती टेलर, संजय सहस्रबुद्धे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्तम रित्या केले होते.

Text Box: न्यू यॉर्कचा गणेशोत्सव: डावीकडून दिलीप शेट्ये, निशांत बागुल, आशिष चौघुले      आतापर्यंत स्वयंसेवकांच्या यादीत १७० नावे आली आहेत. विविध कार्यकारिण्या तयार होत आहेत. मला त्या meeting मध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे ९७ च्या अधिवेशनात काम केलेले सुधाकर वेलंकीवार, अविनाश पाटील आणि आता उत्साहाचे उधाण आलेले १७० नवीन कार्यकर्ते यातला समन्वय. हास्यविनोदाबरोबरच कुशल मार्गदर्शनाचे आणि attention to detail चे विविध दाखले meeting मध्ये दिसून आले. याच दिवशी BMM चा बॉस्टन मंडळाबरोबरचा MOU सुद्धा Sign झाला.

      सप्टेंबर २२-२६ च्या दरम्यान MIFTA (Marathi International Film & Theatre Awards) साठी मी लंडनला जा‌ऊन आलो. मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतल्या दिग्गजांची भेट झाली. भारताबाहेरचे सर्वात जुने असे महाराष्ट्र मंडळ, लंडन यांच्या पदाधिकाऱ्यांशी तसेच २०१२ चे युरोपि‌अन संमेलन भरवणाऱ्या Cardiff च्या टीमशीही चर्चा केली आणि त्या सर्वांना आपल्या बॉस्टनच्या Convention चे निमंत्रण दिले. नुसतेच attendees म्हणून नाही तर एखादा कार्यक्रम सादर करण्यासाठी.

      बृहन्महाराष्ट्र मंडळाची विविध उद्दिष्टांवरची कामे नेटाने सुरू आहेत. BMM च्या मराठी शाळेच्या प्रकल्पात आमच्या डेलावे‌अरच्या मंडळाचीही भर पडली. प्रख्यात साहित्यिक रत्‍नाकर मतकरी यांच्या हस्ते शाळेचे उद्‍घाटनही झाले.

      हा अंक तुमच्या हाती पडेपर्यंत दिवाळीचे आगमन जवळ आले असेल. BMM च्या तुम्हा सर्व सभासदांना, हितचिंतकांना ही दिवाळी सुखाची, समृद्धीची व भरभराटीची जावो हीच सदिच्छा.

      ता.क.: सोन्याचा भाव आणि झळाळी दिवसेंदिवस वाढतच आहे तेव्हा $2000/Ounce भाव होण्या‌आधी यंदाच्या दिवाळीत सोनेखरेदी नक्की करा...

आपला

Text Box: डेलावे‌अरच्या मराठी शाळेचे उद्‍घाटन करताना श्री. रत्‍नाकर मतकरी      आशिष चौघुले

अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ

            achaughule@gmail.com