August 2010 Report

विलिस टॉवर वरून ...

२०११ सालचे बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अधिवेशन शिकागोमध्ये भरवण्याची संधी दिल्याबद्दल शिकागोवासी, उत्तर अमेरिकेतील मराठी बांधवांचे अतिशय आभारी आहेत. १९८४ साली पहिले अधिवेशन यशस्वी करून ह्या उपक्रमाची सुरवात शिकागोमध्ये झाली. तब्बल सत्तावीस वर्षांनी आपल्या माहेरघरी येणार्‍या अधिवेशनाचे स्वागत करण्यासाठी शिकागोवासी अतिशय उत्साहाने तयारीला लागले आहेत.

     आजपर्यंत स्वयंसेवकांची संख्या २०० च्या वर गेली असून, वेगवेगळ्या १७ समिती प्रस्थापित झाल्या आहेत.

                  "मिळून सारे आपण शिकागोवासी

                  बी.एम्‌.एम्‌. २०११ अधिवेशन करू यशस्वी..."

हा शिकागोवासींचा स्थायीभाव झाला आहे आणि हाच स्थायीभाव द्विगुणित करण्याच्या उद्देशाने ’ह्युमन रिसोर्सेस’ समितीने, मानसी जोशी यांच्या नेतृत्वाखाली २७ जून २०१० रोजी सर्व स्वंयसेवकांचा मेळावा आयोजित केला होता. ह्या मेळाव्यात स्वयंसेवकांना एकमेकांना भेटण्याची आणि विचारांची देवाणघेवाण करण्याची संधी लाभली. ह्याच वेळेस अधिवेशनाला येण्याचे आमंत्रण करण्यासाठी निर्माण केलेल्या ’प्रोमो व्हिडिओ’चे प्रक्षेपण करण्यात आले. तसेच अनुदीप धारकर यांनी युवा समितीच्या कार्याची व सदस्यांची ओळख एका छोट्या व्हिडिओ फिल्मद्वारे करून दिली.

      हे अधिवेशन यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आर्थिक बाजूही तितकीच भक्कम असणे अतिशय महत्त्वाचे आहे हे जाणून, ज्या देणगीदारांनी ३१ मे २०१० च्या अगोदर देणगी देऊन मदतीचा हातभार लावला, त्यांच्यासाठी माहिती आणि प्रसारण समितीने एक ’लकी ड्रॉ’ आयोजित केला होता. ह्या लकी ड्रॉचे लकी विजेते होते राम व उमा केळकर, अविनाश व नूतन वैद्य, आणि हेमलता लिमये.

      ह्या समारंभासाठी अल्पोपहार प्रायोजित केला होता श्री. प्रदीप बागवे यांनी. एकंदर १६० स्वयंसेवकांनी उपस्थित राहून ह्या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला. ’विंडी सिटी’त होणार्‍या बृ. म. मं. २०११ अधिवेशनाचे वारे आता अधिक जोराने वाहू लागले आहेत!

      ह्या भव्य सोहळ्याला शोभेल असेच हे भव्य शहर आणि ह्या भव्य शहराला शोभेल असेच हे बृ. म. मं. २०११ अधिवेशनाचे ठिकाण. शिकागोचे ’मॅकॉर्मिक प्लेस’ हे अधिवेशनाचे ठिकाण नक्की होताच ’हॉटेल, ट्रॅव्हल आणि टूरिझम’ समितीचे सदस्य, येणार्‍या सर्व पाहुण्यांची राहण्याची सोय करण्यासाठी कंबर कसून कामाला लागले. विवेक मोडक यांच्या सहकार्याने ह्या समितीने ’Hyatt Regency McCormick Place’ ह्या हॉटेलशी करार साधला. ह्या हॉटेलमध्ये राहणार्‍या पाहुण्यांना शिकागो शहराच्या सुंदर देखाव्याचे दर्शन आपल्या खोलीतून होऊ शकते, तर मॅकॉर्मिक प्लेसच्या ’एरी क्राऊन’ थिएटरला ते स्कायब्रीजच्या मार्गाने चालत पोहचू शकतात.

      येणार्‍या पाहुण्यांच्या सोयीसाठी काही हॉटेल्स मॅकॉर्मिक प्लेसजवळ आणि काही शिकागोच्या एखाद्या विमानतळाच्या जवळ असणे आवश्यक आहे हे लक्षात घेऊन, ’हॉटेल, ट्रॅव्हल आणि टूरिझम’ समितीने मिडवे हॉटेल सेंटरच्या चार हॉटेल्सबरोबर करार केला. The Courtyard by Marriott, Hilton Garden Inn, Holiday Inn आणि Marriott ह्या चार हॉटेल्सचे वैशिष्ट्य असे की येथे नाष्ता, तसेच मॅकॉर्मिक प्लेसला जाण्यायेण्यासाठी शटल सर्व्हिस मोफत उपलब्ध असेल, तसेच कार पार्किंगही विनामूल्य असेल. ह्या हॉटेल्सबरोबर कराराचा सोहळा दि. १७ जून २०१० रोजी पार पडला. बृ. म. मं. २०११ अधिवेशनाचे संयोजक नितीन जोशी व हॉटेल मॅनेजर जेफ्‌री हेस यांनी ह्या करारावर सह्या करून शिकामोर्तब केले.

      तर मंडळी, लागा आता तयारीला. तुमच्या २०११ च्या प्लॅनरमध्ये २१ ते २४ जुलै ह्या तारखांवर लिहा: बृ. म. मं. २०११ अधिवेशन - गो शिकागो...

 

संगीता चव्हाण

माहिती आणि प्रसारण समिती

बृ. म. मं. अधिवेशन (२०११), शिकागो