July 2010 Report

विलिस टॉवर वरून ...

पडघम BMM चे

अहो BMM येणार म्हणताना वर्ष एकच उरले,

आमंत्रणासाठी आयोजक तयारीला लागले;

पत्रिका छापायची की करायचं E-आवाहन?

चर्चा झडल्या, अनेक विचार सुचू लागले,

म्हणतात नाविन्याचे माहेरघर शिकागो,

मग तिथे होणारं अधिवेशन अभिनव नको?,

ते तर झकास होणारच आणि तुम्हाला बरोबर घे‌ऊन

यशाचा झेंडा उभारणारच !

अहो मराठी माणसे आपण जमीन धरून चालणारी

दूर इकडे आलो तरी मातीशी इमान राखणारी,

अश्या ह्या सोहोळ्याला तुम्ही नक्की येणार ना,

आमच्या पाठीवर कौतुकाची थाप देणार ना?

तुमच्यासाठी खास आम्ही केलाय 'Promo Video',

सबकुछ शिकागो सबकुछ शिकागो,

बघाल तर व्हाल चाट खात्री आहे आम्हाला,

म्हणाल कोण आहे बुवा दिग्दर्शक,

नक्कीच मराठी दिसतो,

पडघम कानी ऐकू येती BMM च्या सोहोळ्याचे,

ह्या प्रोमो मध्ये दडले आहे नाते मराठी मनाचे!

     

      २०११ साली BMM अधिवेशन शिकागोत होणार म्हणताना आपण अवघ्या ११ महिन्यांवर ये‌ऊन ठेपलो. आयोजनाच्या विविध समित्या कार्यरत हो‌ऊन भक्कम आखणीला सुरुवात सुद्धा झाली. आता वेळ आहे ती सर्वांसमोर यायची. नुसतंच "आमच्या शिकागोच्या अधिवेशनाला यायचं हं" असं न सांगता, एक हळुवार संदेश सर्वांपर्यंत पोचवायच्या प्रयत्नातून कल्पना निघाली ती "Promo Video" ची. "Promo Video" म्हणजे "एक झलक, सुर्खीया" असंच काही. सिनेमाचं नाही का असंच असतं?   आपण आधी त्याचे प्रोमोज बघतो म्हणून उत्सुकता वाढते आणि आपण त्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहतो. तोच प्रयोग आम्ही ह्या प्रोमोद्वारे केला आहे. तुम्हाला सांगते, ही प्रोमोची कल्पना सुचल्या पासून अनेक संकल्पना डोक्यात घुमायला लागल्या आणि शिकागोतल्या उत्साही मंडळीनी हे आव्हान स्वीकारलं.‘सत्यजित खारकर’ ने ह्या संपूर्ण प्रोजेक्टचं दिग्दर्शन करण्याचं शिवधनुष्य उचललं आणि माझ्यासारख्या अनेकांनी त्याला "मम" म्हटलं. आता खरी कसोटी होती लिखाणाची. कारण सिनेमासारख्या,ह्या गोष्टीला कोणी एक नायक नायिका नाहीत, तर इथे होता संपूर्ण महाराष्ट्र. महाराष्ट्राची अस्मिता ह्या अवघ्या १० ते १२ मिनिटात दाखवायची कमाल करताना मूळ BMM च्या संदेशाकडे दुर्लक्ष करून चालणार नव्हतं आणि त्यातूनच जवळ जवळ ३७ प्रसंग कागदावर उतरले. ह्या लेखनाच्या प्रक्रियेत मला मोलाचं मार्गदर्शन लाभलं श्री. सुहास तांबे यांचं. आपल्या मनांमनात हे मराठीपण किती रुजलं आहे हे फक्त अभिनयातून तुमच्यासमोर आणताना त्यातला भाव जपला आहे हळुवार संगीताने. अश्विनी खळदकर, निलेश विलेकर आणि सत्यजित खारकर ह्या त्रयीनी संगीताची जादू करून ह्या "Promo Video" मध्ये खर्‍या अर्थाने प्राण फुंकले आहेत.

            मी मराठी आहे, तुम्ही मराठी आहात असं काही आपण बिरूद ला‌ऊन रोज मिरवत नाही पण तरीही एक अदृश्य नातं आपल्या संस्कारांशी, आपल्या मातीशी कायम जागृत असतं. म्हणजे पहा नं कालनिर्णयवर श्रावण शुक्रवार दिसला कि मला जिवती आठवते, भाद्रपदात तिकडे कोकणात बसलेल्या बाप्पाची आरती माझ्या कानात घुमायला लागते, घरी पूजा करताना आवर्जून कुंकू लावलं जातं. अजून तरी आपण वयाचा मान नक्की राखतो, मुलांना विक‌एंडला मराठी सुद्धा शिकवतो. अहो हेच तर आहे आपलं खरं रूप. कितीही प्रयत्न केले तरी प्रत्येक श्वासात  वसलेल्या मराठीला न विसरू शकणाऱ्या अश्या ह्या मराठीचा उत्सव म्हणजे BMM अधिवेशन. आपल्या सुहृदांबरोबर, आप्तांबरोबर कलास्वाद घ्यायचा हा सोहोळा. गेली १४ अधिवेशने रसिकांच्या मनात घर करून आहेत. आता तिसरी पिढी पाहिलेल्या मराठी बंधूभगिनींना दर दोन वर्षांनी भरणारे हे अधिवेशन दसरा दिवाळीपेक्षा सुद्धा जवळचे आहे. पहिली पिढी इथे आली आणि मराठीची पताका अटकेपार लावली. इथे रुजायला, फुलायला ह्या पिढीचे कष्ट आणि नंतर आलेल्यांची मेहनत कारणीभूत आहे. शिकागोच्या अधिवेशनात सर्व जुन्या गोष्टींना उजळा मिळेल ह्याची खात्री आहे कारण अधिवेशन आपल्या माहेरघरी येते आहे. ह्या प्रसंगाला साजेशी अशी एक कविता मला स्फुरली आणि सत्यजितच्या दिग्दर्शनातून आणि अनेक वर्षे शिकागोत वास्तव्य असलेल्या प्रसिद्ध अभिनेत्री ’अनुपमा’ ह्यांच्या प्रसन्न व्यक्तिमत्वाने ती किती जिवंत झाली आहे हे तुम्ही प्रत्यक्ष पडद्यावरच बघा.

      हा video करताना केलेली मेहनत आणि दाखवलेली कल्पकता ही कोणत्याही व्यावसायिक निर्मितीच्या तोडीची आहे. सगळ्यात महत्वाची आणि अभिमानाची बाब अशी की,ह्या video चे लेखक, दिग्दर्शक, संकलक, संगीतकार, कलाकार, गायक आणि वादक हे शिकागोवासी असून त्यांनी आपापल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून ही उत्तम कलाकृती निर्माण केली आहे. चित्रीकरणाच्या वेळी professional gadgets ची कमतरता भासू न देता त्यावर मात करत इतकं उत्तम framing केलंय की, आमच्या टीमला आता नवीन ऑफर्स साठी डायरी रिकामी ठेवावी लागेल बहुतेक! कलाकारांची, गायकांची निवड आणि त्यांचं सादरीकरण हे म्हणजे एकदम मिळून आलेलं रसायन झालं आहे. तर आता थोड्याच दिवसात तुमच्या भेटीला येतो आहे “BMM PROMO VIDEO". ह्या उपक्रमात अनेकांची साथ लाभली, त्यातील प्रमुख नावं म्हणजे अनुपमा भट आणि अपर्णा खारकर. अश्विनी खळदकर संगीताची बाजू पेलत असताना तिच्या दोन वर्षांच्या दोन्ही मुलांची जबाबदारी तिचा नवरा विनय आणि तिची आ‌ई सांभाळत होते. असे कळत न कळत अनेकांचे हात ह्या उपक्रमाला लाभले आहेत. ह्या लेखात जरी सर्वांचा नामोल्लेख करणं जमलं नाही, तरी खुद्द Video मध्ये सर्वांचा नामनिर्देश केला आहे. परत एकदा सर्वांचे आभार.

      मंडळी, काही म्हणा इंटरनेटने जग जरी जवळ आलं हे खरं खरं असलं तरी पण, मनात आलं कि आ‌ईच्या हातची पुरणपोळी Chat वर खाता येत नाही, ई-भा‌ऊबीज करताना बहिणीच्या हातून गंध ला‌ऊन घेता येत नाही. मनात आलेलं पुस्तक लगेच बाजारात जा‌ऊन आणता येत नाही, रोजच्या रामरगाड्यात देखील आ‌ईने औषध घेतलं असेल का, बाबा उन्हात तर नसतील न बाहेर जात ह्यांनी मन भरून येतं. पण काळजी करू नका. साता समुद्रापार आलेले आपण सगळेच, दाखवत नसलो तरी कधीतरी मनातून होमसिक होतोच होतो. मागे राहिलेले नात्यांचे दुवे आपण परत एकदा इथल्या धाग्यांनी जोडायचा प्रयत्न करतो. आता तुम्ही म्हणाल की videoत दाखवलंय तरी काय? तर आत्तापर्यंत जे बोलले तेच. अहो आत्ताच सगळं कसं सांगून चालेल? थोडं थांबा आणि तुमच्या आमच्या मनातली गोष्ट पडद्यावरच पहा!

      माणूस हा जात्याच उत्सवप्रिय असतो. त्यातून आपण तर मराठी! अमृताची वाणी लाभलेले आपण साहित्य, कला यांचे  पा‌ईक. मग पथारी महाराष्ट्रापासून दूर असली म्हणून काय झालं? इथेही आपण आपल्या मातृभाषेचा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करूया! अश्यावेळी जर आपल्याला समभाषिक, समविचारी मंडळी भेटली की कसं प्रसन्न वाटेल. म्हणूनच तुम्हाला परत एकदा माहेरचा पाहुणचार घायला आम्ही शिकागोकर आग्रहाचं आमंत्रण देतो आहोत! सगळ्यांनी सहपरिवार, मित्र मंडळींसह मोठ्या संख्येने ह्या मराठीच्या उत्सवाला नक्की या!

          

           रेवती ओक

           माहिती आणि प्रसारण समिती

           बृ. म. मंडळ अधिवेशन (२०११), शिकागो