Feb 2010 Report

विलिस टॉवर वरून...

   मंडळी, दोन वर्षांनी होणार असलेले बृहन्महाराष्ट्र मंडळाचे  अधिवेशन आता दीड वर्षावर येऊन ठेपले आहे. कार्यकारिणीच्या कामाला वेग आला आहे. कार्यस्थळ तर न, झालं. आता त्याच्या जवळ, सोयीच्या, योग्य दराच्या हॉटेलच्या खोल्या पाहुण्यांसाठी न, करणे, जरुरी असल्यास हॉटेलपासून कार्यस्थळापर्यंत     येण्याजाण्यासाठी बसची व्यवस्था करणे, कार्यस्थळातील भोजनगृह,  विक्री केंद्रे कशी, कुठे उभारायची, त्यासाठी कंत्राटदारांबरोबर करार करणे अशा विविध कामांना सुरुवात झाली आहे. अधिवेशनासाठी प्रमुख पाहुणे, मान्यवर व्यक्ती यांना आमंत्रण देणे व त्यांची येण्याजाण्याची, रहाण्याची व्यवस्था करणें या कार्याला गती आलेली आहे. याशिवाय महत्त्वाचे म्हणजे लहान थोरांसाठी यथोचित कार्यक्रम! या अधिवेशनात उत्तर अमेरिकेतील कलाकारांना जास्त प्राधान्य दिले जाणार आहे.

   अधिवेशनातील महत्वाची व सर्वांच्या आवडीची गोष्ट म्हणजे,   आपल्या मित्रमंडळींबरोबर सुग्रास भोजनाचा आस्वाद घेणे. कारण त्याच वेळेस गप्पांसाठी कसली आडकाठी नसते व तीन दिवस आयते जेवण म्हणजे तर पर्वणीच. हे सर्व प्रत्यक्षात उतरण्यासाठी आत्ता हमी द्यावी लागते हजारोंच्या आकड्यात व खर्च होतो    लाखांच्या घरात. अर्थातच देणग्यांच्या स्वरुपात गंगाजळी जमवावी लागते. मग एवढया मोठया  प्रमाणात अधिवेशन करण्याची  गरज  आहे का? एवढं मोठं Convention Center घेण्याची जरुरी आहे का? असा प्रश्न पडतो. उत्तर आहे अर्थातच! कारण चार हजाराहून अधिक अपेक्षित उपस्थिती असलेल्या अधिवेशनासाठी प्रशस्त कार्यस्थळ आवश्यकच आहे. अधिवेशनाचा आवाका मोठा असला तरी खर्च करताना कुठेही उधळ-माधळ होणार नाही याची  काळजी कार्यकारिणी घेतेच. म्हणूनच निधी संकलनार्थ १३ फेब्रुवारीस शिकागोत थ्री इडियटस् चित्रपटातील सुपरस्टार माधवन् बरोबर गप्पागोष्टींचा कार्यक्रम आयोजित केला. पण अधिवेशन यशस्वी होते सर्वांच्या मदतीमुळे. ही मदत होते स्वतः देणगी देऊन, देणगीदार मिळवून, कार्पोरेशन्सकडून matching funds मिळवून आणि अधिवेशनाला उपस्थित राहून. २०११चे अधिवेशन ४ जुलैला नसून २१ ते २४ जुलैला आहे ह्याची आपण नोंद केली असेलच. वृत्तातून व www.bmm2011chicago.org  ह्या संकेतस्थळावर सविस्तर माहिती मिळेलच. 

                                     मोहिनी जोशी, शिकागो