Jan 2010 Report

विलिस टॉवर वरून...

नमस्कार मंडळी,

   बृहन्महाराष्ट्र वृत्ताच्या सर्व वाचकांना महाराष्ट्र मंडळ शिकागो तर्फे नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

   बृ. म. मंडळाच्या २०११ च्या शिकागो येथील अधिवेशनाच्या घोषवाक्य स्पर्धेत भाग घेतलेल्या ६३ प्रवेशिकांतून बृ. म. मंडळ  अधिवेशन समितीने बहुमताने निवडलेले घोषवाक्य आहे,

जरी विश्वात्म होऊ, अंतरीं मराठी राहू

सर्व स्पर्धकांच्या उत्साही प्रतिसादाबद्दल त्यांना मन:पूर्वक धन्यवाद. स्पर्धेतल्या विजेत्या प्रवेशिकेचे प्रेषक आहेत, शाम्बर्ग, इलिनॉय येथील श्री सुहास तांबे! समितीच्या सर्व प्रतिनिधींना आलेल्या प्रवेशिका स्पर्धकांच्या नावांशिवाय पाठविल्या होत्या. त्यामुळे त्यांना केवळ गुणवत्तेच्या कसोटीवर नि:पक्षपाती निर्णय घेता आला.   मायभूमीपासून हजारो मैल दूर राहून महत्वाकांक्षेची भरारी घेणाऱ्या पण तरीही मनातून आपल्या भाषेशी, संस्कारांशी आणि अस्मितेशी एकनिष्ठ असलेल्या तमाम मराठी बांधवांची भावनाच या घोषवाक्यात प्रतिबिंबित झाली आहे असे वाटते. अधिवेशनाच्या, किंबहुना बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या ध्येयाशी निगडीत असलेले हे घोषवाक्य तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा आहे. स्पर्धेसाठी काही चांगल्या रचना आल्या होत्या तर काही घोषवाक्या ऐवजी घोषकाव्यासारख्या देखील होत्या. परंतु विजेती रचना सर्वार्थाने संयुक्तिक वाटली.

   आता आम्हाला आतुरेतेने प्रतीक्षा आहे ती अधिवेशनाच्या बोधचिन्हाची. घोषवाक्य आणि बोधचिन्ह हे अधिवेशनाचे मानबिंदू आहेत. ते सर्वांच्या कायम लक्षात राहतील अशी आम्हाला खात्री आहे. बोधचिन्ह स्पर्धेबद्दल खाली माहिती  दिली आहेच.  

  अधिवेशनाच्या कार्याला शिकागोमध्ये जोमाने सुरुवात झाली आहे. विविध प्रकारच्या सतरा समिती सुमारे १२० कार्यकर्त्यांच्या  सहाय्याने कार्यरत झाल्या आहेत. एक शिस्तबध्द पण आनंददायी अनुभव देण्यासाठी सर्व कार्यकर्ते अतिशय उत्सुक आहेत. बृ. म.  मंडळाच्या जन्मस्थानी होणारे हे अधिवेशन आपल्या सर्वांच्या चिरकाल स्मरणात राहावे हीच आमची सदिच्छा आहे. कृपया अधिवेशनाच्या www.bmm2011chicago.org ह्या संकेतस्थळास भेट द्या आणि आपल्या सूचना आम्हाला आवर्जून कळवा.

                                                 धन्यवाद!

                                                 नितीन जोशी, शिकागो अधिवेशन संयोजक 

 

बृ. . म. मंडळ अधिवेशन शिकागो २०११-  बोधचिन्ह स्पर्धा

 २०११ च्या शिकागो अधिवेशनाच्या  जरी विश्वात्म होऊ, अंतरीं  मराठी राहू  ह्या  घोषवाक्याला  साजेसे  आणि अर्थपूर्ण बोधचिन्ह  तयार करा. आपली कलाकृती (अथवा स्पर्धेसंबंधी प्रश्न) कृपया  इमेलद्वारा संयोजक नितीन जोशी (nnj21@sbcglobal.net) यांच्याकडे  १५ फेब्रुवारी २०१० पर्यंत पाठवा. विजेत्या व्यक्तीला अधिवेशनाची  एक प्रवेश पत्रिका आणि स्मरणिकेत प्रसिध्दी देण्यात येईल.